मुंबई, 20 जानेवारी: ऑस्ट्रेलियाचा दौरा (IND VS AUS) गाजवून भारतात परतणाऱ्या Team India चं स्वागत करायला देशवासीय उत्सुक आहेत. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांच्याच मातीत धूळ चारायचा विक्रम भारतीय टीमच्या यंग ब्रिगेडने केला आहे. हे यश मिळालं आहे मुंबईकर कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाला. पण मुंबईत आल्यानंतर नेमकं काय करावं लागेल, घरातच थांबावं लागेल की आणखी कुठे हॉटेलमध्ये क्वारंटाइन (Quarantine rules in india) म्हणून राहावं लागेल, याविषयी या विजयी ब्रिगेडला अजूनही अंदाज नाही. कारण याविषयीच्या नियमांच्या बाबतीत मुंबई महापालिका (BMC) आणि सरकार यांच्यात एकवाक्यता नाही. किंबहुना यांच्या क्वारंटाइन नियमाचं काय करायचं याबाबत काहीच ठरलेलं नाही.
युरोपात डिसेंबरमध्ये नव्या कोरोनाव्हायरच्या (New strain of coronavirus) स्ट्रेनने खळबळ उडाल्यांतर क्वारंटाइनचे नियम कठोर केले गेले. सुरुवातीचे काही दिवस तर ब्रिटनची (Covid-19 UK) विमान वाहतूक थांबवण्यातच आली होती. नंतर आलेल्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी आणि क्वारंटाइनचे नियम पाळण्याची सक्ती केली गेली. अजूनही परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी क्वारंटाइनचा नियम लागू आहे.
विशेषतः युरोप आणि मध्यपूर्वेतल्या देशांमधून आलेल्या नागरिकांसाठी कठोर नियम आहेत, कारण तिथे कोरोनाव्हायरसचं थैमान अजून सुरू आहे. वास्तविक भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाहून येतोय. हा देश Covid-19 च्या तडाख्यातून थोडक्यात वाचलेल्या देशांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियात दैनंदिकन कोरोनारुग्णांचं प्रमाण आता अगदी कमी झालेलं आहे. हा देश धोकायदायक देशांच्या यादीत नाही. पण टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकेल अशी गोष्ट वेगळीच आहे.
भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतणार नाही. बहुतेक खेळाडूंच्या फ्लाइट्स मिडल इस्टला जाऊन येणाऱ्या आहेत. डायरेक्ट फ्लाइट्स नाहीत. त्यामुळे मध्यपूर्वेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू होणारे क्वारंटाइनचे नियम या खेळाडूंनाही लावणार का?
काय आहे BMC चा नियम?
अजिंक्य रहाणेपासून शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ, रोहित शर्मा असे खेळाडू मुंबईतच राहणारे आहेत. त्यांना मुंबई महापालिकेच्या नियमानुसार क्वारंटाइन राहावं लागणार का? महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी दक्षा शहा सांगतात, "मुंबई महापालिकेचे क्वारंटाइन नियम स्पष्ट आहेत. आफ्रिका, मध्यपूर्व किंवा युरोपातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन म्हणजे संस्थात्मक विलगीकरणात राहावं लागतं. अर्थातच त्याला काही अपवाद अलिकडे केले गेले आहेत. त्यासाठी वेगळा फॉर्म आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यासाठीची माहिती वेबसाइटवर आहे."
भारतीय टीममधल्या खेळाडूंना संस्थात्मक विलगीकरणात राहावं लागणार का असं विचारलं असता, त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. याचा निर्णय विमानतळ प्राधिकरण घेईल. हा त्यांच्याही अखत्यारितला विषय आहे.
वास्तविक मुंबईच्या खेळाडूंनी थेट घरी जायचं की नियमाप्रमाणे क्वारंटाइन व्हायचं हे महापालिकेने ठरवायला हवं. तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबद्दलचे नियम स्पष्ट आहेत. पण खेळाडूंनी मायदेशी परतल्यावर काय करायचं याविषयी कोणीही स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही. याविषयी अद्यापही गोंधळाचीच परिस्थिती आहे.