मुंबई, 21 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बाधित रूग्णांची संख्यात आता 63 वर पोहोचली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात आज 21 मार्च रोजी एकूण रुग्णांची संख्या ही 63 वर पोहोचली आहे. शुक्रवारीही संख्या 52 वर होती. त्यामुळे गेल्या 24 तासांत 11 नवीन रुग्ण आढळून आल्याची बाबसमोर आली आहे.
Coronavirus positive cases in Maharashtra rise to 63; eleven more cases found since Friday evening: Official
— Press Trust of India (@PTI_News) March 21, 2020
राज्यातील 4 शहरं बंद करण्याची घोषणा कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी कडकं पावलं उचलली आहे. मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘सर्वत्र एकाच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे म्हणजे घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे. जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे. अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत.’ पुढचे 15-20 दिवस अत्यंत महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे. काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या. अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलावणार. यापूर्वी ५० टक्के कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला होता, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच, बँका सुरूच राहतील. खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, औषधी यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. भारतात 8 दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 89 वरुन 250! दरम्यान, भारतात गेल्या 8 दिवसांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 89 वरुन 250 पर्यंत पोहोचली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयं, मंदिर, मशीद, गार्डन, जिमखाने बंद 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण गेल्या 8 दिवसांत वेगाने वाढल्याचं लक्षात आलं आहे. 13 मार्चला रुग्णांची संख्या 89 होती ती 24 तासांत 96 पर्यंत गेली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक शहर लॉकडाउनच्या दिशेनं पावलं उचलत असल्याचं पाहायला मिळत आहे. बऱ्यापैकी अनेक शहरांमध्ये सरकारी वाहतूक वगळता दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी दरम्यान, कोरोना साथीच्या रोगाचा महाराष्ट्र जोमाने मुकाबला करीत आहे. सध्या या रोगाच्या दुसऱ्या टप्यातील संक्रमण अवस्थेत आपण आहोत. तिसऱ्या टप्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी लागेल. विशेषत: चाचणी केंद्रे आणि प्रयोगशाळा यांच्या सध्याच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली.