MPSC परीक्षा घेतली तर वाईट परिणाम भोगावे लागतील, संभाजीराजेंचा थेट इशारा

MPSC परीक्षा घेतली तर वाईट परिणाम भोगावे लागतील, संभाजीराजेंचा थेट इशारा

मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत मराठा समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.

  • Share this:

नवी मुंबई, 07 ऑक्टोबर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. या बैठकीत '11 तारखेला जर MPSC ची परीक्षा घेतली तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील', असा इशारा राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत मराठा समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार भाषण करत  राज्य सरकारला इशारा दिला आहे.

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता. मुख्यमंत्र्यांनी कुणाशी आणि काय बोलायचं याची विचारणा केली. मी म्हटलं मराठा समाजाची भूमिका स्पष्ट आहे.  तुम्ही बोलावलं तर चर्चेसाठी आम्ही येण्यासाठी तयार आहोत. पण, MPSC च्या 11 तारखेला जर परीक्षा झाल्या तर सरकारला गंभीर परिणाम भोगावा लागेल', असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.

'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी नेतृत्त्व करणार नाही, तर खांद्याला खांदा लावून लढा देणार आहे. ज्यांना नेतृत्व करायचे आहे. त्यांनी जबाबदारी घेऊन पुढे यावे आणि लढा द्यावा.  पण आज मराठा समाजामध्ये दोन गट पडले आहे. मराठा समाजात दुफळी आणण्याचा काही जण प्रयत्न करत आहे. हे दुर्दैवाचे आहे, अशी खंतही संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

'शाहू महाराज यांनी समाजाला आरक्षण दिले. मराठा समाज हा सर्व समाजाला सोबत घेऊन  राहिला आहे. मराठा समाजाला मागास असल्याचे सिद्ध केले आहे. मग आता मराठा समाजाला आरक्षणमधून बाहेर का फेकले जात आहे, असा सवालही संभाजीराजे यांनी उपस्थितीत केला.

'मराठा समाजाला पूर्ण आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी आमचा लढा आहे. आर्थिक दुर्बल घटकामध्ये मराठा समाजाला टाकू नये. आर्थिक दुर्बल घटकामध्ये मराठा समाजाला टाकलेले खपवून घेणार नाही', असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.

Published by: sachin Salve
First published: October 7, 2020, 5:28 PM IST

ताज्या बातम्या