मुंबई, 14 जुलै: गेल्या आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. पुण्यासह घाट परिसरात आणि कोकण किनारपट्टीवर तर पावसानं धुमशान घातलं आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसाची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD) रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत आज अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
त्याचबरोबर आज पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, जालना, परभणी आणि नांदेड या सात जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या सात जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहणार आहे. त्यामुळे नागरिकांना लांबचा प्रवास न करण्याचा आणि आकाशात विजा चमकत असताना मोठ्या झाडाखाली आडोशाला न उभं राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. आज राज्यात पाच जिल्ह्यांना रेड तर सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
District Forecast & Warnings for Next 5 Days by IMD for Maharashtra, 14 - 18 july pic.twitter.com/AqfnMZL3Mt
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 14, 2021
हेही वाचा-COVID-19 Vaccine: लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे अधिक दुष्परिणाम का होतात?
आज सकाळपासूनचं राज्याची पश्चिम किनारपट्टी आणि घाट परिसरात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्यानं नुकत्याच जारी केलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार, आज कोकण किनारपट्टी, घाट परिसर, मुंबई, ठाणे, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांत ढगांनी मोठ्या प्रमाणात दाटी केली आहे. यानंतर उद्यापासून टप्प्याटप्प्यानं राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. 18 जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होत असला, तरी काही राज्यात मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा-Explainer: भारतात नव्यानं डोकंवर काढलेला Kappa व्हेरिएंट किती घातक?
जून महिन्याच्या उत्तर्धात राज्यात मान्सूननं दीर्घ ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात राज्यात पुन्हा मान्सूननं वापसी केली असून सध्या मान्सूननं संपूर्ण देशात मजल मारली आहे. पाच दिवस उशीरा मान्सून दिल्लीत दाखल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Mumbai, Pune, Weather forecast