मुंबई 20 डिसेंबर : बदलत्या हवामानाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होतो आणि त्यांना सर्दी-खोकला होऊ लागतो. अशा परिस्थितीत लोक बहुतेकदा कफ सिरप वापरतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? की ते खूप धोकादायक असू शकतं. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. यात कफ सिरप प्यायल्यानंतर 30 महिन्यांच्या बाळाच्या हृदयाचे ठोके बंद झाले. मुंबईतील पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट तिलु मंगेशकर यांच्या अडीच वर्षांच्या नातवाला १५ डिसेंबर रोजी खोकला आणि सर्दीचा त्रास होत होता. यानंतर त्याच्या आईने मल्टीनेशनल कंपनीचं कफ सिरप बाळाला दिलं, मात्र औषध दिल्यानंतर 20 मिनिटांत बाळ अचानक कोसळलं आणि त्याच्या हृदयाचे ठोके बंद झाले. यासोबतच मुलाला श्वासही घेता येत नव्हता. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हृदयाचे ठोके बंद झाल्यानंतर मुलाच्या आईने त्याला तात्काळ मुंबईतील हाजी अली भागात असलेल्या एसआरसीसी रुग्णालयात नेलं. यादरम्यान, तिने मुलाला कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) देणं सुरू ठेवलं. त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाचे डोळे उघडण्यासाठी, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढण्यासाठी सुमारे 20 मिनिटं लागली. मुलाच्या आईने सांगितलं की, या घटनेनंतर आम्ही अनेक चाचण्या केल्या, पण खोकल्याच्या औषधाशिवाय दुसरं कारण आम्हाला सापडलं नाही. त्या म्हणाल्या की, वैद्यकीय तपासणीत असं आढळून आलं की औषधात क्लोरफेनरामाइन आणि डेक्सट्रोमेथोरफान संयुगे आहेत, जे FDA ने चार वर्षांखालील मुलांना देण्यास बंदी घातली आहे. मात्र, या औषधावर असं कोणतंही लेबल नसल्याने डॉक्टर ते रुग्णांना देत आहेत. या प्रकरणाबाबत एका ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञांनी सांगितलं की, मुलाला हा त्रास होणं आणि खोकल्याच्या औषधाचा डोस यांचा थेट संबंध जोडणं सोपं नाही. महाराष्ट्राच्या बालरोग कोविड टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ. विजय येवले म्हणाले की, त्यांनी चार वर्षांखालील मुलांसाठी कफ सिरपची शिफारस केलेली नाही. ते पुढे म्हणाले की, बहुतेक परिस्थितींमध्ये कफ सिरपची आवश्यकता नसते. ते म्हणाले की नवीन पुरावे आढळले आहेत जे हे दाखवतात की काही खोकल्याचे सिरप हृदयाच्या समस्या वाढवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.