मुंबई, 21 एप्रिल : कोरोनाचं संकट भारतात येवून धडकल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कधी नव्हे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे. दिवसागणिक मुंबईत वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोणी म्हणत आहे मुंबईची इटली होणार तर कोणी म्हणत आहे आहे मुंबईत आर्मीला बोलावण्याशिवाय पर्याय नाही. पण या सगळ्या स्थितीत मुंबईतून एक दिलासादायक बातमी आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातून 'कोरोना कोविड 19'चा 100 वा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. रुग्णाने व त्याच्या नातेवाईकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह कस्तुरबा रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. कस्तुरबा रुग्णालयातून आतापर्यंत कोरोनाचे 100 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले असून या रुग्णांमध्ये 24 जेष्ठ नागरिकांचा, तर दहा वर्षाखालील 7 बालकांचाही समावेश आहे.
'संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी देशभरातील सर्वात जुन्या रुग्णालयांपैकी एक, अशी ओळख असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाने 'करोना कोविड 19' या आजाराशी सुरू असलेल्या लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज याच रुग्णालयातून 'कोरोना कोविड 19' ने बाधित शंभरावा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. घरी परतण्यापूर्वी निरोप घेताना या रुग्णाने कस्तुरबा रुग्णालयातील अत्यंत सेवाभावाने काम करीत असलेले डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा - पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी, 'या' वेळेतच सुरू राहणार पेट्रोल पंप
साधारणपणे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 'कोरोना कोविड 19'चा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आजपर्यंत कस्तुरबा रुग्णालय हे 'कोरोना कोविड 19'ने बाधित रुग्णांना अव्याहतपणे सेवा देण्यात अग्रेसर आहे. या रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, कामगार, कर्मचारी अक्षरशः दिवस-रात्र एक करून रुग्णांवर औषधोपचार करत आहेत.
कस्तुरबा रुग्णालयातून आजवर जे 100 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत त्यामध्ये 60 पुरुषांचा आणि 40 महिलांचा समावेश आहे. तसेच यामध्ये 60 वर्षावरील वय असणाऱ्या 24 जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर 10 वर्षाखालील 7 बालकांचाही बरे होऊन घरी परतलेल्यांमध्ये समावेश आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus