मुंबई, 5 फेब्रुवारी : राजकारणातले आर.आर.पाटील आपल्याला सर्वानाच माहीत आहेत मात्र आबां एव्हढेच सुसंस्कृत आणी प्रामाणिक आर.आर.पाटील राज्याच्या पोलीस दलातही आहे. विशेष म्हणजे पोलीस दलातील आर. आर. पाटील दुसरे तिसरे कुणी नसून स्वतः स्वर्गीय आबांचे लहान भाऊ आहेत. ज्यांचं नाव आहे राजाराम पाटील. पोलीस दलातील अनेक अधिकारी आजही क्रिम पोस्टिंग मिळावी म्हणून मंत्र्यांच्या मागे लागलेले असतात.
मात्र ज्यांचा स्वतःचा भाऊ बारा वर्षे राज्याचा गृहमंत्री असताना देखील वीस वर्षे साईड ब्रँचला काम केलं ते प्रामाणिक अधिकारी म्हणजे राजाराम पाटील असल्याच सांगत अजित पवारांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी राजाराम पाटील यांनी एक खुलासा केला. त्यांनी कधीच आबांना मतदान केलं नसल्याचं यावेळी सांगितलं. त्यामुळे अनेकांना त्यांच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आला. आबा हयात नसताना त्यांच्या प्रामाणिकपणाच्या गोष्टी आजही सांगितल्या जातात. त्यांच्या प्रमाणे राजाराम पाटील हेदेखील तितकेच प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असल्याचं या एका छोट्याशा प्रसंगावरुन समोर आलं.
दिवंगत आर.आर पाटील यांचे भाऊ राजाराम पाटील यांच्या पोलीस दलातील निरोप समारंभदरम्यान अजित पवारांनी त्याचं कौतुक केलं. pic.twitter.com/tvcUiVPK7f
— News18Lokmat (@News18lokmat) February 5, 2021
पिंपरी चिंचवड पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या आर आर पाटलांची करवीर येथे बदली झाली त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या निरोप समारंभात अजित पवार बोलत होते. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पोलीस दलातील वरिष्ठांकडून मिळालेला सन्मान आपल्या कार्याची पोच पावती आहे आणि आई आणि स्वर्गीय आबांमुळे हे शक्य झाल्याचं सांगत राजाराम पाटील यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अजित पवार म्हणाले, सेवाकाळात त्यांना दोन वेळेस राष्ट्रपती पदक मिळालं. तर या कार्यकाळात त्यांनी 651 बक्षीसं मिळवली. 2006 रोजी गुणवत्ता पूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळाल्याचं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Pune ajit pawar