Home /News /mumbai /

राष्ट्रवादी पक्षातला भावूक क्षण, पवारांना शुभेच्छा देताना ज्येष्ठ नेत्याला अश्रू अनावर, VIDEO

राष्ट्रवादी पक्षातला भावूक क्षण, पवारांना शुभेच्छा देताना ज्येष्ठ नेत्याला अश्रू अनावर, VIDEO

'शरद पवार यांनी सातत्याने समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. माझ्या सारख्या अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला'

    मुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा (Sharad Pawar 80th Birthday)आज 80 वा वाढदिवस आहे. देशभरातील नेते आणि पक्ष शरद पवार यांना शुभेच्छा देत आहे. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांना अश्रू अनावर झाल्याचा भावूक क्षण पाहण्यास मिळाला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीकडून  डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्व नेत्यांना मुंबईत बोलावणे शक्य नव्हते, त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कोल्हापूरमधून हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. 'शरद पवार यांनी सातत्याने समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. माझ्या सारख्या अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला. 2009 साली मिरजमध्ये जातीय दंगल झाली होती. त्यावेळी या दंगलीचा परिणाम हा पश्चिम महाराष्ट्रावर झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बरेच नेते हे पराभूत झाले होते. पण मी मात्र प्रचंड मतांनी विजयी झालो होतो. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती की, आज मला सगळ्यात जास्त आनंद झाला आहे, कारण सत्ता जरी आली असली तरी माझा हसन मुश्रीफ नावाचा अल्पसंख्याक कार्यकर्ता निवडून आला, यापेक्षा दुसरा आनंद नाही' असं म्हणताच हसन मुश्रीफ यांना व्यासपीठावर अश्रू अनावर झाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी  शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 'शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत, मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे, त्यांचा हा 80 वा वाढदिवस आहे. राज्यात कोविडचे वातावरण आहे, परंतु, सर्व खबरदारी घेवून जल्लोष साजरा करत आहोत. जवळपास 60 वर्षांपेक्षा जास्त काळ पवार साहेबांना राजकारणात झाले आहे.' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसंच 'आज देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही झाले की, लोक म्हणतात, यामागे शरद पवार यांचा हात आहे, पण मी या सर्व गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही, मी असे म्हणेन की जेव्हा जेव्हा देशात किंवा राज्यात समस्या उद्भवतात तेव्हा प्रत्येक जण पवार यांच्याकडे या आशेने पाहतो की ते नक्कीच तोडगा काढतील' असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला. हिमालयातील उंचीच्या महाराष्ट्रातील सह्याद्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असं म्हणत अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Sharad Pawar birthday

    पुढील बातम्या