मुंबई, 5 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विलेपार्ल्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे व 2019 च्या विले पार्ले विधानसभेतील मनसेच्या महिला उमेदवार जुईली शेंडे यांनी शिव बंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी परिवहन मंत्री, विभाग प्रमुख अनिल परब व युवासेना वरुण सरदेसाई उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी रेणु शर्मा या प्रकरणामुळे माजी आमदार कृष्णा हेगडेंचं नाव चर्चेत आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केलेल्या रेणु शर्मा हिच्याविरोधात कृष्णा हेगडेंनी पोलिसात तक्रार केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
काय म्हणाले कृष्णा हेगडे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना काळातील काम बघून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. धनंजय मुंडे यांच्या पाठिशी राहून रेणू शर्माविरोधात तक्रार करणं, ही वैयक्तिक गोष्ट होती. त्यानंतर भाजपकडून दबाव आला म्हणून पक्ष सोडला हे चुकीचे आहे. मला भाजपमधून तसा कुणीही फोन केला नाही. शिवसेनेकडून कोणतंही आश्वासन घेतलेले नाही. मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी काम करेन.
दरम्यान मुंबई महापालिकेचा वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प बुधवारी जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पात संपूर्ण मुंबईसाठी एकच प्राधिकरण असावे अशी मागणी राज्य सरकारकडे पाठवली असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत 16 प्राधिकरण असून प्रत्येक कामासाठी वेगवेगळी प्राधिकरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena, Udhav thackeray