मुंबई, 18 जानेवारी : पोळीला किंवा चपातीला योग्य आकार देण्यासाठी लागणारी गोष्ट म्हणजे लाटणं. प्रत्येकाच्या घरात स्वयंपाक करताना अनेक गोष्टी वापरण्यात येतात. त्यातील महत्त्वाची आणि दररोजच्या वापरात येणारी वस्तू म्हणजे लाटणं.महाराष्ट्रातील प्रत्येक घरात लाकडी लाटणं वापरलं जातं. पारंपरिक आणि वर्षानुवर्ष टिकून राहाव यासाठी लाकडाचा वापर केला जातो. पोळीला किंवा चपातीला योग्य आकार यावा यासाठी लाटण्याचा खूप मोठा वाटा आहे. हे लाटणं कसं बनवितात हे तुम्हाला माहिती आहे का? मुंबईमध्ये एका महोत्सवाच्या निमित्तानं आलेले तानाजी यादव यांनी हे लाटणं कसं बनवितात याची माहिती दिली आहे. सातारा येथील औंध येथे राहणारे तानाजी यादव हे गेल्या अनेक वर्षापासून लाकडी लाटणं बनवीत आहेत. तानाजी यांच्या चार पिढ्यांपासून हा व्यवसाय सुरू आहे. पारंपरिक लाकडी लाटणं बनवून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच काम ते अनेक वर्षांपासून करत आहेत. क्या बात है! विद्यार्थ्यांनी तयार केलेली 150 सॅटेलाईट अवकाशात झेपवणार, Video तानाजी यादव सांगतात की, आंबा, बाभळी, बोर या झाडाच्या लाकडापासून आम्ही गेली अनेक वर्ष लाटणं बनवतो. तसेच याच लाकडापासून रवी, पोळपाट, लाटणं, पापडाचं लाटणं, चमचे अश्या घरगुती वस्तू ज्या स्वयंपाक घरात वापरल्या जातात त्या बनवितो. दीड फुटाच्या लाकडातून पारंपरिक मशीनच्या साहाय्याने काही अवजार वापरून त्या लाकडी ओंडक्याला लाटण्याचा आकार दिला जातो. या लाटण्यांची किंमत साधारण 70 रुपयापासून 150 रुपये इतकी आहे. रवीची किंमत 100 पासून 500 रुपयांपर्यंत आहे.
‘आमच्या घरात पणजोबापासून हा व्यवसाय सुरू आहे. आम्हाला या व्यवसायाची आवड होती. आपली संस्कृती टिकून रहावी यासाठी मी हा व्यवसाय सुरू ठेवला. मला माझ्या पत्नीनंही यामध्ये साथ दिली. आता पुढची पिढी हा व्यवसाय करेल का हे सांगता येणार नाही,’ असं तानाजी यांनी सांगितलं.