मुंंबई, 7 एप्रिल: कवीवर्य सुरेश भटांच्या कवितेतील या ओळी आहेत ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने सुटका केली, जगण्याने छळले होते' पण काहींच्या बाबतीत मरणानंतरही अवहेलना चुकत नाही. असाच एक दुर्दैवी तरुण आहे धारावीतील (Dharavi) सचिन जैसवार. गेली अडीच वर्षे त्याचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलच्या (J. J. Hospital) शवागारात पडून आहे. अवघ्या सतरा वर्षाच्या सचिन जैसवार (Sachin Jaiswar) याचा जुलै 2018 मध्ये जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस ठाण्यात (Police Station) अमानुष मारहाण झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या देहाचे दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टेम (Postmortem) करावे अशी मागणी केली आणि त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे तेव्हापासून सचिनचा मृतदेह जे. जे. हॉस्पिटलच्या शवागारात (Mortuary) ठेवण्यात आला आहे. आता न्यायालयानं (6 एप्रिलपर्यंत) सचिनच्या मृतदेहाचे पुन्हा पोस्टमार्टेम करून त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता अडीच वर्षानी सचिनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गरीब कुटुंबातील सचिन जैसवार या धारावीत राहणाऱ्या मुलाला मोबाइल (Mobile) चोरल्या प्रकरणी जुलै 2018 मध्ये पोलीसांनी पकडून नेलं होतं. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर (FIR) नोंदवलेला नसताना देखील पोलिसांनी त्याला जबरदस्तीनं ताब्यात घेतलं आणि पोलिस ठाण्यात त्याला अमानुष मारहाण केली.
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं घेतला गळफास,10 लाख आणण्यासाठी लावला होता तगादा
त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सोडण्याची वारंवार विनंती केली तेव्हा सचिनला त्यांच्या ताब्यात देण्यात आलं, तेव्हा त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं; पण काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. त्याचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं तेव्हा त्याच्या मृत्यूचं कारण न्युमोनिया देण्यात आलं. हा अहवाल मान्य नसल्यानं त्याच्या कुटुंबीयांनी, पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला असून, पुन्हा त्याचे पोस्टमॉर्टेम करावे अशी मागणी करत सचिनचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयानं या प्रकरणी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज बघून आणि दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर सचिनच्या मृतदेहाचे दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टेम करण्याचा आदेश दिला आहे. आताच्या पोस्टमॉर्टेमसाठी पहिल्यांदा पोस्टमॉर्टेम केलेल्या टीममधील डॉक्टरांऐवजी दुसरे डॉक्टर्स घेण्याचा आणि हॉस्पिटलच्या डीननी स्वतःच्या सहीसह पोस्टमॉर्टेमचा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. यामुळे अखेर अडीच वर्षांनी अंत्यसंस्काराची वाट पाहणाऱ्या सचिनच्या मृतदेहाला न्याय मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Dharavi, Mumbai, Police complaint, Postmortem