राहुल खंडारे, बुलढाणा, 06 एप्रिल: पुरोगामी महाराष्ट्राली लाजवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. जेसीबी विकत घेण्यासाठी सासरच्या मंडळींनी त्रास दिल्यानं एका विवाहित महिलेनं आत्महत्या केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवऱ्यानं आणि सासरच्या अन्य मंडळींनी जेसीबी घेण्यासाठी माहेरवरून पैसे आण अशी मागणी सातत्याने सूनेकडे केली जात होती. त्यामुळे सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या (Suicide) केली आहे. याप्रकरणी नवऱ्यासहित अन्य चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित घटना बुलढाणा जिल्ह्यातील डोणगांव येथून जवळच असलेल्या बेलगाव गावात घडली आहे. येथील एका परिवाराने जेसीबी घेण्यासाठी विवाहितेचा छळ केला आहे. जेसीबी घेण्यासाठी माहेरवरून 10 लाख रुपये घेऊन ये असा तगादा सासरच्या मंडळीने लावला होता. त्यासाठी मृत महिलेचा वारंवार मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.
बेलगाव येथील आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव प्रतीक्षा वानखेडे असून आरोपी पतीचं नाव गजानन वानखेडे असं आहे. गेल्या काही काळापासून आरोपी गजाननने मृत प्रतीक्षाकडे माहेरवरून 10 लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. या सर्व छळाला कंटाळून प्रतीक्षानं अखेर गळफास लावून आत्महत्या केली आहे.
(हे वाचा- दारूड्या पतीने घरालाच लावली आग; पत्नी आणि मुलांसह सहा जणांचा होरपळून मृत्यू)
याप्रकरणी मृत प्रतिक्षाच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वडीलांच्या तक्रारीनुसार पती गजानन वानखेडे आणि त्याचे आईवडील बालाजी वानखेडे व मंदोदरी वानखेडे यांच्यासह मनिषा रामेश्वर बोडखे आणि अश्विनी सोमेश बाजड यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.