Home /News /mumbai /

'त्या' चाचण्या चुकीच्या, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

'त्या' चाचण्या चुकीच्या, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

कोरोनाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

    मुंबई, 10 ऑगस्ट : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्यभरात कोरोनाच्या चाचण्यांवर भर दिला जात आहे. परंतु, भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'ॲंटीजन चाचण्यांचे रिपोर्ट  65 टक्के चूक ठरतात असं आढळून आलं आहे.  त्यामुळे RT-PCR चाचण्या करणेच आवश्यक आहे' अशी मागणी केली आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक चाचण्या या राज्यात होत आहे. राज्य सरकारकडून जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. परंतु, अँटीजन चाचण्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. 'महाराष्ट्रात 6 ऑगस्टला एकूण 78,711 चाचण्यांपैकी 50,421 चाचण्या ॲंटीजन होत्या, म्हणजे 64 % टक्के चाचण्या करण्यात आल्या. तर फक्त 27440 चाचण्या RT-PCR चाचण्या होत्या, म्हणजे 34 टक्के करण्यात आल्या होत्या. आणि 850 चाचण्या इतर पद्धतीने करण्यात आल्या' असा आक्षेप देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. 'ॲंटीजन चाचण्यांचे रिपोर्ट हे 65 टक्के चूक ठरतात असं आढळून आलं आहे. त्यामुळे RT-PCR चाचण्या करणेच आवश्यक आहे.  राज्यात रोज  54000 पेक्षा जास्त RT-PCR चाचण्या करण्याची क्षमता असताना त्याचा पूर्ण क्षमतेने वापर केला गेला पाहिजे' अशी मागणीही फडणवीस यांनी केली. 'आपल्या कोरोना लढ्याचा मार्ग हा अधिकाधिक वैज्ञानिक असायला हवा. कोरानाच्या लढ्यातील आपल्या सध्याच्या व्युव्हरचनेचा पुनर्विचार केला पाहिजे' असंही फडणवीस म्हणाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68. 25 टक्के तर दुसरीकडे राज्यात 9 ऑगस्ट रोजी हाती आलेल्या आकडेवारीनुसार  कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा उच्चांक झाला आहे. गेल्या 48 तासांमध्ये तब्बल 13,348 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ही 3 लाख 51 हजार 710 एवढी झाली आहे. तर नव्या रुग्णांची संख्याही वाढली असून दिवसभरात 12,248 नवीन कोरोना रुग्ण नोंद झाली. राज्यात 390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68. 25 टक्के एवढे आहे. राज्यात 10 लाख 588 व्यक्ती घरात स्वतंत्र विलगीकरणात आहेत तर 34 हजार 957 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. राज्यात  एक लाख 25 हजार 558 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या