मुंबई 14 एप्रिल: देशात कोरोनाबाधितांची(Coronavirus) संख्या वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 339 वर गेली आहे. महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या 2334 एवढी झाली आहे. तर 160 लोकांचा मृत्यू झालाय. यात 101 जण हे फक्त मुंबईमधले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. प्रचंड लोकसंख्या, दाटीवाटीतली घरं, झोपडपट्ट्या, अस्वच्छता यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. तर सर्व देशात प्रत्येक 5वा रुग्ण हा महाराष्ट्रातला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत ‘मिशन धारावी’ सुरू करण्यात आलं असून तब्बल साडेसात लाख लोकांचं स्क्रिनिंग होत आहेत. त्यामध्ये ज्यांना लक्षणे आढळली त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जात आहे. मुंबईतला कोरोनाचा प्रसार काही थांबता थांबेना. अतिशय झपाट्याने या काही भागात कोरोनाचा प्रसार होतोय. त्याची साळखी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र त्यात अजुनतरी यश आलेलं दिसत नाही. मुंबईतला जी दक्षिण हा वॉर्ड सर्वात जास्त धोकादायक बनला आहे. गेल्या 12 तासांमध्ये तिथे 28 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या वॉर्डमधल्या रुग्णांची संख्या 308वर गेली आहे. जी दक्षिण या वॉर्डमध्ये वरळी, प्रभादेवी, एलफिन्स्टन हे उच्चभ्रू आणि झोपडपट्टी असलेले विभाग येतात. ‘महिना झाला, मुलाची भेट नाही; त्याच्या आठवणीने डोळे भरुन येतात’ तर इ वॉर्ड म्हणजे भयखळ्यातील रुग्णसंख्या 125 वर गेली आहे. तिथे 5 रुग्ण वाढले. तर डी वॉर्ड म्हणजे ग्रांट रोडची रुग्णसंख्या107वर गेलीय. तिथे10 रुग्णांची वाढ झाली. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आढळली आहे. धारावीमध्ये आज आणखी नवे 6 रुग्ण आढळले आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज सकाळी धारावीत नवे 6 रुग्ण आढळले आहे. 4 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या नवीन रुग्णासह धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता 55 वर पोहोचली आहे. हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी मागितली या 7 मुद्यांवर तुमची मदत, एकदा नक्की वाचा! नरेंद्र मोदी यांनी 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनबाबत काही भागांत शिथिलता आणणार असल्याचं म्हटलं असलं तरीही एक इशाराही दिला आहे. ‘गरिबांसाठी, हातावर पोट असणाऱ्यांसाठी या लॉकडाऊनमध्ये 20 एप्रिलनंतर सुरक्षितता असेल त्या ठिकाणी सवलत असेल. रब्बीची पीक काढणी सुरू आहे. त्यावर परिणाम होऊ नये म्हणून उपाययोजना केली आहे. पण बेजबाबदारपणा केला तर सवलती काढून घेण्यात येतील,’ असं नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, संपूर्ण देश 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातील सर्व नागरिकांना 3 मेपर्यंत नियमांचं पालन करावं लागणार आहे. या दिवसांमध्ये सगळ्यांना खूप काळजी घ्यावी लागणार असल्याचंही मोदी म्हणाले. दरम्यान, काही राज्यांनी आधीच 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. पण आता मोदींनी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची मोठी घोषणा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.