मुंबई, 24 ऑगस्ट : मुंबईकरच नाही तर अवघे राज्य गेले 2 वर्ष कुठलाही उत्सव साजरा करू शकलेले नाही. कोरोनाच्या सावटाखाली गेले दोन वर्ष सगळे सण समारंभ मोजक्या लोकांमध्ये आणि सर्व नियंमांचे पालन करून साजरा करावे लागत आहेत. यंदाही दहीहंडी उत्सवाला (mumbai dahihandi ) सरकारने मनाई केली आहे. पण, भाजपचे आमदार राम कदम (ram kadam) यांनी घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सव (ghatkopar dahihandi 2021) घेणारच अशी गर्जना केली आहे. त्यांच्यापाठोपाठ आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सुद्धा ठाण्यात दहीहंडी घेणारच अशी घोषणा केली आहे.
मुंबईकरांचा आवडता दहीहंडी उत्सव यावर्षी ही साधेपणाने साजरा करावा लागेल, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे. राज्य सरकारची दहीहंडी आयोजक समन्वय समितीबरोबर झालेल्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. पण, भाजपचे आमदार राम कदम यांनी हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. तर तसाच निर्धार मनसेचे ठाण्याचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
मनसेच्या वतीने अविनाश जाधव ठाण्यात दहीहंडीते आयोजन करतात. त्यांनीही आपल्याला सणासाठी परवानगी मिळावे असे पत्र ठाणे पोलिसांना लिहिले आहे. त्याला लवकरच उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. आपण उत्सव साजरा करूच असं त्यांनी बोलून दाखवले आहे.
दरम्यान, राम कदम यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'महाराष्ट्रच्या जनतेला अपेक्षा होत्या की नियमांचे पालन करून उत्सव साजरा करता येईल पण हे अपशकुनी सरकार आहे. सरकारच्या नियमांचे पालन करत गोविंदांची सण साजरा व्हावा असे आम्हाला वाटले. पण तुमचे निर्णय थोपायचे आहेत तर मग बैठकीचे नाटक कशाला? लोकांनी स्वत:च्या आरोग्याची काय काळजी घ्यावी, हे एसीच्या घरात बसणाऱ्यांनी सांगू नये, असे सांगताना घाटकोपरमध्ये उत्सव साजरा होणारच, सरकारने किती ही अडवले तरी दहीहंडी उत्सव करणारच असा इशाराच त्यांनी दिला आहे.
तर दुसरीकडे या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या बैठकीत आम्हाला बोलूच दिले नाही, असा आरोप करत हा सण साजरा करणारच असे म्हटले आहे. सर्व गोष्टी सुरू होतात मग केवळ हिंदू सणांच्या बाबतीतच सरकार आडमुठेपणा का करते असा सवाल विचारला आहे. त्यामुळे आगामी काळात दहीहंडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्ह आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.