मुंबई, 20 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत वाढत आहे. वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात कोरोना संसर्ग पसरण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीती भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्य सरकारकडून वारंवार खबरदारीचे उपाय घेतले जात आहे. लोकांना वारंवार सूचना दिल्या जात आहे. परंतु, तरीही लोकांकडून नियमांचं काटेकोर पालन केलं जात नाहीये. त्यामुळे समूह संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांनी राज्य सरकारकडून दिलेल्या जाणाऱ्या सुचनांचं नीट पालन केलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.
Hon PM @narendramodi ji’s decision of #JantaCurfew is scientific!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 20, 2020
जनता कर्फ्यु हा वैज्ञानिक निर्णय !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेले आवाहन हे सर्वांच्या हिताचे, त्याचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे.
आज देशवासियांकडून मोठ्या अपेक्षा ! https://t.co/ZV25URebBn pic.twitter.com/MFwkyPJ7om
तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू ही अभिनव संकल्पना मांडली आहे. जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेत सहभागी झालं पाहिजे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लोकांनी घरीचं थांबलं पाहिजे, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं. आज मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर अशा महानगरांमधील व्यवहार ठप्प होत असताना रोजंदारी कामगारांबाबत काही उपाययोजना राज्य सरकारला कराव्या लागतील. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात सुमारे 50 लाख बांधकाम कामगार आहेत. बांधकाम कामगारांसाठीचा एक सेस राज्य सरकारकडे आहे. त्यात सुमारे 4000 कोटी रूपये निधी आहे. या निधीचा वापर करून या रोजंदारी कामगारांच्या जेवणाची, त्यांच्या भत्त्याची व्यवस्था राज्य सरकारला करता येईल. इतरही विविध प्रकारचे कामगार दैनंदिन उत्पन्नावर उदरनिर्वाह करीत असतात. अशांसाठी स्वयंसेवी संघटनांकडून मदत घेऊन, त्यासंदर्भात एसओपी तयार करून तपशीलवार मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची सुद्धा नितांत गरज आहे. रोजगारावर जे संकट आले त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने पाऊले उचलण्याची गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने विविध प्रकारच्या फाईलिंगच्या तारखा जूनपर्यंत लांबणीवर टाकल्या आहेत. त्याच धर्तीवर राज्यातील महापालिकांना सुद्धा 31 मार्चपर्यंत जे कर भरावे लागतात, त्याला मुदतवाढ देण्याचे निर्देश देण्याची गरज आहे. काही ठिकाणी सक्तीने वसुली किंवा जप्तीच्या कारवाई होत आहेत. त्या या काळात करू नयेत, अशा सूचना निर्गमित करण्याची गरज आहे. देणी सक्तीने वसुल न करता थोडा वेळ जनतेला द्यायला हवा, अशी सूचना करून ते म्हणाले की, बँकांचे एनपीएचे नॉर्म शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली आहे. त्यावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करते आहे. सध्या विविध महानगरांमध्ये रेल्वे स्थानकावर गावी परत जाणार्यांची मोठी गर्दी उसळली आहे. महानगरातील संकट हे हळूहळू गावांकडे जाणार नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल. रेल्वे स्थानकांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था तिप्पट करणे, तेथे पोलीस बंदोबस्त वाढविणे, ही गर्दी ज्या भागात जात आहेत, तेथे सुद्धा आरोग्य तपासणीच्या पुरेशा व्यवस्था निर्माण करणे, आवश्यकता भासल्यास तेथे आयसोलेशनच्या व्यवस्था उभाराव्या लागणार आहेत. यातूनच गर्दीतून होणारा संसर्ग थांबविता येईल. महाराष्ट्रातील स्थिती सध्या गंभीर आहे, असेही ते म्हणाले. दिवसांगणिक रूग्णसंख्येत होणारी वाढ पाहता नागरिकांनी स्वत:वर निर्बंध घालणे आवश्यक आहे. यामुळेच जनता कर्फ्यू महत्त्वाचा आहे. त्यातून आपण ही सायकल मोडू शकणार आहोत. यात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. आम्ही सर्व सूचना केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवितो आहे. राज्य सरकारच्या सर्व योजनांना संपूर्ण समर्थन आहे. या सूचनांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना राज्यभरातील कार्यकर्त्यांना सुद्धा देण्यात आल्या आहेत. ही देशावरची आपत्ती आहे. आपण सारे एकजुटीने याचा मुकाबला करू, असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्णांची संख्या 52 वरुन 63 वर महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 52 वरुन 63 वर पोहोचली आहे. मुंबईत 10 नवीन रुग्ण आढळले आहे. तर एक जण पुण्यात आढळला आहे. मुंबईत विदेशातून आलेले 8 रूग्ण तर संसर्गातून तिघांना लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात 11 रुग्णांची वाढ झाली आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. आतापर्यंत आढळलेल्या 63 रुग्णांपैकी 12 ते 14 जणांना संर्गातून कोरोनाची लागण झाली आहे तर उर्वरित कोरोनाबाधित हे परदेशातून आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. लोकल ट्रेनही बंद करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मत आहे. परंतु, अजून राज्य सरकारने तसा कोणताही निर्णय घेतला नाही. खबरदारी म्हणून जनतेने सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळावा, असं आवाहनही टोपे यांनी केलं. मुंबईतून बाहेर जाणाऱ्या रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्राकडे केली आहे. जेणेकरून सध्या रेल्वे स्थानकांवर होत असलेली गर्दी कमी होईल. जर गर्दी कमी होणार नसेल तर मुंबईत लोकल बंद करावीच लागेल, असं स्पष्टपणे राजेश टोपे यांनी सांगितलं.