मुंबई, 10 एप्रिल: कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) घेण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या को-विन अॅप (Co-win App) मध्ये नवी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे मुंबईकरांना कोरोना लस घेतल्यानंतरही प्रमाणपत्र मिळत नसल्याचं (Mumbaikar not getting covid vaccinated certificate) समोर आलं आहे. मुंबईतील अनेक नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत असल्याचं वृत्त समोर येत आहे. मुंबईच्या बीकेसी (BKC, Mumbai) मधील डायमंड बोर्स (Diamond Bourse) येथे काम करणारे मनजीभाई पटेल (Manjibhai Patel) यांनी सांगितले की, त्यांनी लसीकरणासाठी साइटवर नोंदणी केली आणि त्यानंतर पहिला डोसही घेतला. मात्र, त्यांना टेक्स्ट मेसेजही आला नाही आणि लस घेतल्याचं प्रमाणपत्रही मिळालं नाही असं वृत्त टाइम्स ऑफ इंडिया ने दिलं आहे. लस घेतल्याचं प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या आदेशानुसार मला 10 एप्रिलपासून आवारात प्रवेश करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी डेटा एन्ट्री अधिकाऱ्यांनी सांगितले की, कधीकधी दोन्ही डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र मिळते. पण काहीवेळा प्रमाणपत्र डाऊनलो़ड होत नाही. कधीकधी लाभार्थ्यांकडून चुकीचा फोन नंबर दिला गेल्याने अशा समस्या उद्भवतात. लसीकरणात महाराष्ट्र अव्वल लसीचा मर्यादित साठा असूनही महाराष्ट्राने शुक्रवार (9 एप्रिल 2021) पर्यंत 97 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण करुन महाराष्ट्राने पहिल्या क्रमांकावर सातत्य राखून ठेवले आहे. शुक्रवारी म्हणजेच 9 एप्रिल 2021 रोजी दिवसभरात सुमारे 3 लाख लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली असून अंतिम आकडेवारी त्याहूनही जास्त असल्याचा अंदाज आहे. हे पण वाचा: लसीकरणानंतरही अनेकांचा कोरोना अहवाल का येतोय पॉझिटिव्ह? इथे वाचा महत्त्वाची कारणं महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती काय? 9 एप्रिल 2021 रोजीच्या आकडेवारीनुसार, राज्यात शुक्रवारी 58,993 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४५,३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २६,९५,१४८ करोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.९६% एवढे झाले आहे. शुक्रवारी राज्यात 301 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.