विरार, 23 एप्रिल: पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये आग! गेले काही दिवस अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि वारंवार त्यात भर पडत आहे. मुंबईजवळ असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील विरारमधून (Virar Fire) देखील शुक्रवारी पहाटे अशीच घटना घडली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला. या घटनेमध्ये अतिदक्षता विभागात असणाऱ्या 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. पुन्हा रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश, निष्पापांचे बळी जात असताना ढिम्म पडलेली आरोग्य यंत्रणा- हे सर्व काही वारंवार घडत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ही रुग्णालयं आहेत की मृत्यूचे सापळे असा सवाल उपस्थित राहतो आहे.
महाराष्ट्रः पालघर ज़िले के विरार में विजय वल्लभ कोविड अस्पताल में आग लगने से 13 मरीज़ों की मौत हो गई। pic.twitter.com/hhMtLZeVwJ
— ANI_HindiNews (@AHindinews) April 23, 2021
या आगीमध्ये 13 रुग्णांनी प्राण गमावले आहे. विरार पश्चिम याठिकाणी विजय वल्लभ या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घटना घडली आहे. घटनास्थळावरून समोर येणारे व्हिडीओ तर हृदय पिळवटून टाकणारे आहे.
रुग्णालयांमध्ये बेसिक सुविधाच नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनेच्या रात्री आयसीयू पूर्ण भरलेलं होतं, मात्र याठिकाणी एकही डॉक्टर नव्हता असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्यांच्या आईची प्रकृती सुधारत होती आणि ही घटना घडली. त्यांच्या आईचा देखील या आगीमध्ये मृत्यू झाला आहे. हे वृत्त सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या मते याठिकाणी साधा फायर एक्सटिंग्विशर देखील नव्हता. त्यामुळे आयसीयूतील रुग्णांचा एकतर होरपळून किंवा घुसमटून मृत्यू झाला.
आणखी एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या आक्रोशाचा व्हिडीओ समोर आला आहे. ही सारीच दृश्य हृदय पिळवटून टाकणारी आहेत. मिळाालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसई विरार मनपाच्या आयुक्तांसह पोलिसांकडून या घडनेची माहिती घेतली आहे आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. आग कशी लागली, कुणाच्या बेजबाबदारपणामुळे लागली याबाबत चौकशी करून कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.