नवी दिल्ली, 17 जून : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’या चित्रपटातून परदेशात पालकत्वाशी संबंधित कायदे किती कडक आहेत याची झलक आपल्या सर्वांना दिसली. याच घटनेशी साधर्म्य असलेला एक खटला जर्मनीची राजधानी बर्लिनमधील एका कोर्टात सुरू आहे. या प्रकरणात एक भारतीय दाम्पत्य आपली मुलगी परत मिळवण्यासाठी लढा देत आहेत. जर्मन न्यायालयानं त्यांना कोणतीही दया न दाखवता मुलीची कस्टडी स्थानिक प्रशासनाकडे दिली आहे. अरिहा शहा असं या भारतीय मुलीचं नाव आहे. बर्लिनमधील पँकोव स्थानिक कोर्टानं अरिहाच्या पालकांचा युक्तिवाद फेटाळून लावत तिचा ताबा जर्मन स्टेटकडे दिला आहे. हा निकाल अरिहा शहाच्या पालकांसाठी मोठा धक्का आहे. शहा दाम्पत्याकडे मुलगी सोपवल्यास तिचं भविष्य धोक्यात येईल,अशी टिप्पणी कोर्टानं13जून रोजी दिलेल्या निकालात केली आहे. इंडियन एक्सप्रेसनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार,पँकोव कोर्टानं जन्मदाते पालक असलेल्या धरा आणि भावेश शहा यांच्याकडे थेट अरिहाचा ताबा देण्यास किंवा थर्ड पार्टी असलेल्या इंडियन वेल्फेअर सर्व्हिसेसकडे सोपवण्यास नकार दिला आहे. कोर्टाने पालकांचा या संबंधी अर्ज फेटाळून लावला आणि अरिहाचा ताबा स्थानिक वेल्फेअर संस्थेकडे दिला आहे. शहा दाम्पत्य स्वत:ला अरिहाचे पालक म्हणवू शकत नाहीत. ती कुठे राहील याचा निर्णय घेण्याचा अधिकार देखील त्यांना नाही,असं कोर्टानं म्हटलं आहे. काय आहे प्रकरण? 2018मध्ये मुंबईतील भावेश शहा आणि धरा शहा हे जोडपं नोकरीसाठी जर्मनीला गेलं होतं. तिथे त्यांना अरिहा नावाची मुलगी झाली. एके दिवशी अरिहा खेळत असताना ती चुकून पडली आणि तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली. तिच्या पालकांनी तिला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिला त्वरित वैद्यकीय मदत मिळाली. त्यानंतर भावेश आणि धरा शहा यांना रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी बोलावून घेतलं. अरिहाच्या जखमांची तपासणी केल्यावर,तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला. मात्र,अरिहाला तिच्या आजीकडून चुकून दुखापत झाल्याचा दावा पालकांनी केला होता. Surname Shange Case : जात लपवायची असेल तर आडनाव बदलता येतं? हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण आदेश या प्रकारानंतर अरिहाला 23सप्टेंबर 2021 रोजी जर्मनीतील युवक कल्याण कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आलं होतं. त्यावेळी ती केवळ सात महिन्यांची होती. तेव्हापासून तिचं तिथेच पालनपोषण होत आहे. अरिहा सध्या दोन वर्षांची आहे. भारतीय पालकांनी तिचा छळ केल्याचा आरोप करत जर्मन अधिकाऱ्यांनी तिला युवक कल्याण कार्यालयाच्या देखरेखीत ठेवलं आहे.20महिन्यांहून अधिक काळ पालकांपासून दूर असलेल्या भारतीय मुलीला परत पाठवण्याची विनंती भारतानं जर्मनीला केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून अरिहाला मायदेशी आणण्यासाठी मदत मागितली आहे. 3जून रोजी एका मीडिया ब्रीफिंगमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की,अरिहाचं जर्मनीमध्येच पालनपोषण होणं हे तिच्या सामाजिक,सांस्कृतिक आणि भाषिक अधिकारांचं उल्लंघन आहे. भारत सरकार आणि तिच्या पालकांसाठी हा गंभीर चिंतेचा विषय आहे. बागची म्हणाले, “आम्ही पुन्हा-पुन्हा सांगत आहोत की,अरिहा शहा ही भारतीय नागरिक आहे. तिचं राष्ट्रीयत्व आणि सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी हे घटक तिचं पालनपोषण कोठे केलं जाईल याचे सर्वात महत्वाचे निर्धारक आहेत. आरिहाला लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची आम्ही जर्मन अधिकाऱ्यांना विनंती करतो. अरिहाला भारतात परत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार,अरिहाच्या पालकांनी एका निवेदनात भारत सरकारवर विश्वास व्यक्त केला. त्यांना विश्वास आहे की,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अरिहाला भारतात परत आणतील. जर्मन कोर्टानं दिलेल्या निकालानंतर पालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,आजपासून आम्ही अरिहाला140कोटी भारतीयांच्या स्वाधीन करत आहोत. अरिहा सात महिन्यांची असताना सप्टेंबर2021मध्ये बर्लिनमधील जर्मन अधिकाऱ्यांनी तिला तिच्या पालकांपासून दूर नेलं होतं. तिचे वडील त्यावेळी जर्मनीत काम करत होते. पण,सध्या तिचे आई-वडील भारतात परतले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.