(प्रतिनिधी) शंकर आनंद, मुंबई, 15 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभऱात 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व नागरिकांनी जिथे आहात तिथे सुरक्षित राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. मात्र मोदींचं हे आवाहन आणि प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखण्याचं काम काही लोकांनी केलं आहे. सूरतनंतर मंगळवारी वांद्रे इथे घडलेला प्रकार धक्कादायक होताच पण त्यामागे खूप मोठं षड्यंत्र असल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आपण जर नीट पाहिलं तर तिथे जमलेल्या मजूरांच्या हातात कोणत्याही प्रकारच्या बॅगा, सामान काहीच नव्हतं. फक्त मजूर आपल्या गावी जाण्यासाठी जमले होते असं सांगितलं जात होतं. मात्र या संपूर्ण प्रकरामागे खूप मोठं कनेक्शन आणि षड्यंत्र असल्याची चर्चा होत आहे. हे वाचा- वांद्रे गर्दी प्रकरणावर शरद पवारांनी टोचले भाजपचे कान, म्हणाले… लॉकडाऊन वाढल्यामुळे घरी जाण्यासाठी अनेक मजूर वांद्रे इथल्या बसस्थानकात मंगळवारी एकत्र आले होते. त्यांच्यासाठी 150 बस तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या गाड्यांच्या मदतीनं ते मुंबईतून बिहार आणि उत्तर प्रदेशात आपल्या गावी जाणार होते. मात्र गावी जाण्यासाठी निघालेल्या मजुरांच्या हातात मात्र कोणतंही सामान नव्हतं. याचा अर्थ सरळ होता की या सर्व मजुरांना मुद्दाम भडकवून वांद्रे इथे जमण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मजुरांच्या भावनांचा उद्रेक होईल किंवा तिथे वाद निर्माण होतील अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. त्यामध्ये उत्तर भारतीय पंचायत महासभेचा विनय दुबे याचाही हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विनय दुबे या तरुणानं व्हॉट्सअप मेसेज आणि काही व्हिडीओ फॉर्वर्ड केले होते. या व्हिडीओद्वारे अफवा पसरवून संचारबंदी दरम्यान परप्रांतीय नागरिकांची दिशाभूल करुन त्यांना कुर्ला टर्मिनस तसंच वांद्रे येथे परप्रांतीयांना एकत्र जमण्याचं आवाहन केलं होतं. अफवा पसरवणाऱ्या या तरुणाच्या मुंबई पोलिसांनी मुस्क्या आवळल्या असून त्याची चौकशी सुरू आहे. हे वाचा- सावधान! 3 मेपर्यंत ‘या’ 13 सेवा राहणार बंद, वाचा संपूर्ण यादी संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.