भाजपवर पलटवार करण्यासाठी काँग्रेसचं नवं अस्त्र, नाना पटोलेंनी केला हल्लाबोल

भाजपवर पलटवार करण्यासाठी काँग्रेसचं नवं अस्त्र, नाना पटोलेंनी केला हल्लाबोल

राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने (Congress) नव्या मुद्द्यावरून भाजपवर पलटवार केला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 मार्च : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपने (BJP) एक ना अनेक मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने (Congress) नव्या मुद्द्यावरून भाजपवर पलटवार केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

'धनगर समाज हा दुर्लक्षित घटक असून काही लोकांनी प्रलोभने दाखवून समाजाची फसवणूक केली. यातून समाजातील मुठभर लोकांचा फायदा झाला पण समाज मात्र वंचितच राहिला. धनगर समाजाला आरक्षण (Dhangar Reservation) देण्याचे आश्वासन देऊन भारतीय जनता पक्षाने पाच वर्ष राज्यात सत्ता भोगली, पण आरक्षण काही दिले नाही, ही धनगर समाजाची घोर फसवणूक आहे,' असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

इस्लाम जिमखाना येथे धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नाना पटोले यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सचिन नाईक, देवानंद पवार, अलकाताई गोडे, हरिभाऊ शेळके, ॲड. संदिपान नरोटे आदी उपस्थित होते. यावेळी धनगर समाजाचे प्रतिक असलेलं घोंगडं व काठी देऊन नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, धनगर समाज मागणारा नसून देणारा समाज आहे. आरक्षणाच्या बाबतीतही आदिवासींचे काढून आरक्षण द्यावे ही मागणी नाही. पण भारतीय जनता पक्षाने आरक्षणाचे आश्वासन देऊन धनगर व आदिवासी समाजात वाद लावून दिला. पाच वर्ष राज्यात फडणवीस सरकार होते आणि दिल्लीतही भाजपाचेच सरकार असतानाही फडणवीस यांनी समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. सत्ता येताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणचा निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते.

हेही वाचा - अजित पवारांचा दणका, फडणवीस सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीची घोषणा

'धनगर समाजाने वज्रमूठ बांधावी. सन्मानाची वागणूक व समाजाला सत्तेत वाटा देण्यासाठी प्रयत्न करु,' असं आश्वासन यावेळी नाना पटोले यांनी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ करतात ऐकत कोणाचेच नाहीत ते ऐकताच फक्त नागपूरचे असा टोलाही पटोले यांनी लगावला.

'मोदींनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. सर्वात जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या विकून त्या भांडवलदारांच्या घशात घातल्यानंतर आरक्षणातून मिळणाऱ्या नोकऱ्याच संपणार आहेत. आरक्षण संपवण्याचा भाजपा-आरएसएसचा हा डाव आहे,' असा घणाघाती आरोपी यावेळी नाना पटोले यांनी केला. तसंच धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्याबाबत काँग्रेस पक्ष सकारात्मक असून धनगर समाजातील कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात सन्मान दिला जाईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Published by: Akshay Shitole
First published: March 3, 2021, 11:28 PM IST

ताज्या बातम्या