मुंबई, 26 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार येत्या 28 तारखेला निवृत्त होत आहेत. रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदावर कुणाची वर्णी लागते याची चर्चा सध्या मंत्रालय आणि प्रशासनात आहे. राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्य सचिव पदासाठी कुंटे यांच्या बरोबर प्रवीणसिंह परदेशी यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र प्रवीणसिंह परदेशी मुंबई महापालिका आयुक्त पदावर असताना त्यांचे राज्याचे मुख्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फारसे न जमल्याने तसंच परदेशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे अतिशय निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव राहिल्याने परदेशी यांच्यापेक्षा कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब अधिक होईल असं सांगितले जात आहे.
येत्या रविवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत किंवा त्याआधी सीताराम कुंटे यांच्या मुख्य सचिवपदावरील नियुक्तीचा आदेश काढला जाईल, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडे एमएमआरडीए व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्याची चर्चा देखील सध्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.
हेही वाचा - क्या बात है! अवघ्या 18 तासात 25 किमी डांबरी रस्ता पूर्ण; लिम्का बुकमध्ये नोंद आणि गडकरींकडून कौतुकाची थाप
विधानसभा अध्यक्षपदाचीही निवडणूक होणार?
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर निवडणूक घ्यायची का यावर दोन मतप्रवाह सध्या दिसत आहेत. सत्ताधारी बाकावरून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्याबाबत फारसे अनुकूल नाहीत, असं चित्र आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी निवडणूक कधी होणार, हे पाहावं लागेल.