मुंबई, २९ जून : 'हिंदुस्थान तोडून बॅ. जीनाने पाकिस्तान निर्माण केला, पण तो देश राहिला नसून पृथ्वीवरचे एक डबकेच बनला आहे. तशीच अवस्था या बंडखोर वगैरे म्हणवून घेणाऱ्या झाडी-डोंगरातील गटाची होणार आहे. म्हणून ज्यांचा आत्मा आजही जिवंत आहे, त्यांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे व महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे. गुवाहाटीमध्ये ‘झाडी-डोंगर-हाटील’ वगैरे आहे, पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांची भूमिका आहे. तेव्हा डबक्यातून बाहेर पडा, हे पहिले सांगणे व भाजपने या डबक्यात उडी मारू नये हे दुसरे सांगणे. महाराष्ट्रात विजय भगव्याचाच होईल, असं म्हणून शिवसेनेनं पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारांना घेऊन बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर मोठे संकट आले आहे. आता भाजपने राज्यपालांकडे अधिवेशन बोलवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता बंडखोरांनी मनधरणी करण्यासाठी आता शिवसेनेकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून बंडखोरांना आवाहन करण्यात आले आहे.
'भाजप म्हटलं तर सर्वत्रच आहे, पण कुठेच नाही! त्यांचे काम नारदमुनीप्रमाणे चालते. सुधीर मुनगुंटीवारांसारखे नेते विजयाची दोन बोटे नाचवत आपल्या गाडीतून फिरत आहेत. भाजप आपल्या मित्रांचा, सहकारी पक्षांचा ‘घास’ गिळूनच शांत होतो हे आता झाडीतल्या आमदारांना व नेत्यांना लवकरच कळेल. या आमदारांच्या गटास महाशक्तीचा अजगरी विळखा पडला आहे. हा अजगर अख्खा बोकड गिळावा तसे या गटास गिळून पुढे जाईल. सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निकालानंतर झाडी-डोंगरातील आमदारांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली- “हा बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे!’’ शाब्बास पठ्ठय़ा! आनंद दिघे हे एक निष्ठावान, कडवे शिवसैनिक होते व बाळासाहेबांचा विचार हाच त्यांचा श्वास व ध्यास होता. जीवनभर त्यांनी कोणत्याही पदाची आस धरली नाही. रंजल्या-गांजल्यांचे ते वाली होते. त्यामुळे त्यांच्या कोणत्या विचारांचा विजय झाला? असा सवाल सेनेनं उपस्थितीत केला.
'गद्दारी करणाऱ्यांना विरोध करणारा शिवसैनिक प्रल्हाद सावंत याच्यावर झाडीतल्या आमदारांच्या भाडोत्र्यांनी हल्ला केला हादेखील ठाकरे-दिघेंच्या विचारांचा विजयच समजावा का? शिवसेनेवर होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी लढणाऱया संजय राऊतांवर व्यवस्थित टायमिंग साधून ‘ईडी’चे समन्स पाठवले गेले, हासुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय मानायचा का? आमदार त्या झाडी-झुडुपांतून सांगत आहेत, ‘‘आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही कुठे शिवसेना सोडली? राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून आम्ही इथे झाडी-झुडुपांत आलो!’’ पण या बोलघेवडय़ांपैकी बहुतेक जण राष्ट्रवादीच्या झुडुपांतूनच शिवसेनेत आले व मंत्री झाले. आता त्यांचे बोल काही असू द्यात. शरद पवारांना ते नेते मानतच होते व ‘‘पवारांसारखा नेता होणे नाही’’ असे गौरवोद्गार काढीत होते. मात्र आता त्यांना महाशक्तीच्या अजगरी विळख्याने गिळले व त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची झाडी-झुडुपे, शिवसेना आवडेनाशी झाली. महाविकास आघाडी नको ना? मग या इथे. माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. नवा डाव मांडू, पण पुन्हा त्याच निष्ठने काम करणार आहात का? रामाचे नाव घेता व रावणाची कृती करता! शिवसेनेची अयोध्याच जाळायला हे लोक निघाले आहेत. असं आवाहनही सेनेंनं आमदारांना केलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाची आस धरून बसले असतील तर त्यांना आधी महाराष्ट्रात धुमसणाऱ्या आगीशी सामना करावा लागेल. भाजप हा किती सत्तापिपासू पक्ष आहे व त्यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र रक्षक’ शिवसेना फोडली याचा काळा इतिहास लिहिला जाईल. देवेंद्र फडणवीस यांची ही कृती त्यांच्यावरच उलटेल व भाजपचा टांगा महाराष्ट्रात पलटेल हे आजचे वातावरण आहे. राज्यसभा, विधान परिषदा गद्दारांच्या मदतीने जिंकल्या, पण शेवटी लोकभावना तीव्र आहेत. शिवसेनेतून जे फुटले ते टिकले नाहीत. भुजबळांना शरद पवारांनी व राणेंना भाजपने आधार दिला नसता तर त्यांचे काय उरले असते? असंही सेनेनं म्हटलं आहे,
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.