मुंबई 27 फेब्रुवारी : जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आज विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच पक्षांचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. बुधवारी जेव्हा विधान परिषदेत मराठी भाषा सक्तीचं विधेयक मंजूर झालं त्या वेळी सभागृहात शांतता होती. त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल. हे सांगताना मला कुणाचा अपमान करायचा नाही असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला. विधिमंडळात भाजपकडून सत्ताधारी शिवसेनेला कायम कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. वीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपने त्यांचा गौरव करणारा प्रस्ताव विधिमंडळात आणला होता. मात्र तो फेटाळला गेला. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला होता. फडणवीस हे शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला. मराठी भाषेचं काय होणार याची चिंता करण्याचं कारण नाही. मराठीचं कुणीही काही वाकडं करू शकणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले, मराठीवर प्रेम म्हणजे इंग्रजीचा विरोध नाही. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवूनही मराठीवर प्रेम करू शकतो. मराठी भाषा प्रचिन आहे का याचे आज पुरावे द्यावे लागतात हे दुर्दैवी आहे असंही त्यांनी सांगितलं.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित 'इये मराठीचिये नगरी' - LIVE https://t.co/A4HGZUGBaP
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) February 27, 2020
थोर साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या साहित्याचा गौरव म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस जगात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.