मुंबई, 12 मे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 14 मे रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मुख्यमंत्री विरोधकांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर देणार आहेत. या सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून या सभेचा आता तिसरा टिझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही विधान आहेत. या विधानांमधून ते विरोधकांवर आक्रमकपणे निशाणा साधताना दिसत आहेत. “तुम्ही मला फक्तं वज्र मुठ द्या! दात पडायाचं काम मी करुन दाखवतो! हिंदुत्वाचा खरा अर्थ दाखवून द्यायला, शिवसेनेच्या अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घ्यायला, यायलाच पाहीजे”, असं शिवसेनेच्या तिसऱ्या टीझरमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 14 मे रोजीच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आक्रमक तिसरा टीझर प्रसिद्ध #ShivSena #Maharashtra #UddhavThackeray @ShivSena @ShivsenaComms pic.twitter.com/tKqFnPIkWa
— News18Lokmat (@News18lokmat) May 12, 2022
शिवसेनेकडून 8 मे रोजी उद्धव ठाकरेंच्या पहिल्या सभेचा पहिला टीझर लाँच करण्यात आला होता. पहिल्या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील अंश वापरण्यात आला होता. “मी शिवसेना प्रमुख जरुर आहे. पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे, म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे.”, असं टीझरमध्ये बघायला मिळतंय. तसेच साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या, प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे, असं आवाहनंही शिवसेनेनं टीझरमधून केलं. दोन दिवसांपू्र्वी शिवसेनेकडून दुसरा टीझर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता तिसरा टीझर शेअर करण्यात आला आहे.
शिवसंपर्क अभियान..
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 8, 2022
दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता
स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई pic.twitter.com/WJG687Equn
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मुंबईतल्या बिकेसी मैदानात 14 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंची होणारी सभा अभूतपूर्व करण्यासाठी शिवसेनेची जय्यत तयारी सुरू आहे. शिवसेनेच्या या जाहीर सभेत उद्धव ठाकरे अनेकांच्या तोंडावरचे मास्क उतरवणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी जाहीर केलंय. त्यामुळे या आक्रमक सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. या सभेच्या पूर्वतयारीची पहाणी शिवसेना नेते करत आहेत. परिवहनमंत्री अनिल परब, शिवसेना सचिव सूरज चव्हाण आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आज बीकेसी मैदानावरील तयारीचा आढावा घेतला.