मुंबई, 22 जून : शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार अल्पमतामध्ये आल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी जनतेशी भावनिक साद घातली. हा उद्धव ठाकरेंचा शेवटचा डाव होता. या फेसबुक लाइव्हनंतर एकनाथ शिंदेंच्या निर्णयात काही बदल होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, समोर येऊन माझ्याशी संवाद साधा. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो. संध्याकाळी बंडखोरी केलेल्या आमदारांनी यावं. मला खुर्चीचा कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे माझ्याकडे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळही माझ्यासाठी गौण आहे.
तुम्ही मुख्यमंत्री नको, असं राष्ट्रवादी वा काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं असतं तर एकवेळ ठीक होतं. परंतू आपल्याच लोकांना मी मुख्यमंत्री नकोय हे माझ्यासाठी जास्त दु:खदायक आहे. सध्याची परिस्थिती म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा, गोत्यास काळ. कुऱ्हाडीच्या घावांच्या वेदना होत नाहीत. मात्र या कुऱ्हाडीचा दांडा झाडापासून तयार केलायच याचं जास्त वाईट वाटतं, असं म्हणत ते भावनिक झाले.
शरद पवारांनी माझ्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी टाकली होती. मला त्यावेळी कोणताही अनुभव नव्हता. तरीही मी ती जबाबदारी घेतली आणि नेटाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे...
शरद पवार साहेबांनी माझ्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी टाकली आणि मी ती घेतली.
मला कशाचाही अनुभव नसताना आलेली जबाबदारी मी जिद्दीने पार पाडण्याचा प्रयत्न केला.
2012 मध्ये बाळासाहेब गेले. त्यानंतर 2014 साली एकाकी लढलो. त्यावेळी 63 आमदार निवडून आले. तरीही अनेकजणं त्यांना काही मिळालं नसल्याच्या तक्रारी करीत आहेत. मग मधल्या काळात जे काही मिळालं ते तर बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं आहे.
शिवसेना आणि हिंदूत्व कधीही वेगळं होऊ शकत नाही. हिंदुत्वासाठी कोणी काय काय केलंय हे आताही बोलण्याची वेळ नाही. हिंदुत्वाविषयी बोलणारा मी विधीमंडळातील पहिला नेता असेन.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.