मुंबई, 04 डिसेंबर : महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची भाजपमध्ये स्पर्धाच रंगली आहे. राज्यपाल कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, गोपीचंद पडळकर यांच्यापाठोपाठ आता आमदार प्रसाद लाड यांनीही भलतेच विधान केले आहे. शिवरायांचा जन्म हा कोकणामध्ये झाला होता, असं वक्तव्य लाड यांनी केलं आहे. लाड यांच्या विधानामुळे वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांच्याबाबत एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात नवीन इतिहास मांडला.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— NCP (@NCPspeaks) December 4, 2022
“छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचे बालपण रायगडावर गेले”. असं वक्तव्य लाड यांनी करत पुन्हा एकदा इतिहासाशी छेडछाड केली आहे. (सुप्रिया सुळेंवर टीका भोवली, ‘सत्तारांवर योग्य ती कारवाई करा’, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र) प्रसाद लाड यांच्या विधानामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रसाद लाड यांना चौथीच्या इतिहासाचे पुस्तक पाठवणार आहे. आज रविवार असल्यामुळे पोस्टल विभाग बंद आहे. उद्या त्यांना पत्र देणार आहे. शिवरायांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे. रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे. प्रसाद लाड यांनी जाणीवपूर्वक विधान केलं आहे. एकाने विधान करायचं आणि दुसऱ्याने सारवासारव करायचं हे खपवून घेणार नाही. भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची आणि अपमानाची सुपारी घेतली आहे का? असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला आहे. (भाजप आणि शिंदे गटात चाललंय काय? राऊतांचा खळबळजनक दावा ) तर, प्रसाद लाड जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. भाजप आणि आरएसएस (RSS) ची मंडळी वारंवार बदनामी का करत आहे हे विकृत मानसिकतेचे मनुवादी आहेत. शिवप्रेमी अशा वाचाळवीरांना जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिला.