मुंबई, 10 डिसेंबर : महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Coronavirus Omicron Variant) शिरकाव केल्यानंतर एकीकडे रुग्ण बरे होत आहे तर दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये ओमायक्रॉन बाधित (Omicron patient in mumbai) रुग्णांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे. याआधी मुंबईत दोन रुग्ण आढळले होते. तर महाराष्ट्रात रुग्णांची संख्याही 17 वर पोहोचवली आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रात 3 रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 5 वर पोहोचली आहे. या रुग्णांना कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. तथापि खबरदारीची उपाययोजना म्हणून संबंधित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
तर राज्यात ओमायक्रॉनची रुग्ण संख्याही आता 17 वर पोहचली आहे. राज्यात आज 7 नवीन रुग्ण आढळले आहे. मुंबईमध्ये ३ रुग्ण आढळले आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये 4 रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईतील तिन्ही रुग्ण हे परदेशातून आलेले आहे.
या ७ रुग्णांपैकी चार जणांनी कोरोनाची लस घेतलेली होती. तर एका व्यक्तीने एकच कोरोनाचा डोस घेतला होता. धक्कादायक म्हणजे, या सात जणांमध्ये एका 3.5 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या सातही जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.
धारावीत ओमायक्रॉनचा रुग्ण
तर परदेशातून मुंबईतील धारावीत आलेल्या एका नागरिकाचा कोविड रिपॉर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आता समोर आला असून ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेली व्यक्ती ही मौलवी आहे. मुंबई आल्यानंतर ते धारावी येथील एका मशिदीत वास्तव्यास होते.
सुरुवातील या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. तो अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले आहे. धारावीमध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. या मौलवीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या मौलावीला तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे.
पिंपरीमध्ये 4 जण बाधित
पिंपरीमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांचे रिपोर्ट समोर आले आहे. पिंपरीतील आधी सापडलेल्या 6 ओमायक्रोन ग्रस्तापैकी पैकी 4 जण निगेटिव्ह आले आहे. या चारही जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. ४ रुग्ण बरे झाले असले तरी आणखी 4 रुग्णांची वाढ झाली आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 10 जणांची चाचणी घेण्यात आली आहे. आज या 10 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून 10 पैकी 4 जणांना ओमायक्रोनची लागण झाली आहे. त्यामुळे या चारही जणांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. जे हायरिस्क संपर्कात आले आहे, त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.