मुंबई, 19 मे : सध्या कोरोना लस घेण्यासाठी कोरोना लसीकरण (Corona vaccination) केंद्रावर जावं लागतं. पण मुंबईत आता लवकरच दारोदारी कोरोना लसीकरण मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. काही विशिष्ट नागरिकांना घरीच कोरोना लस दिली जाणार आहे. घरी जाऊन कोरोना लस (door-to-door COVID-19 vaccination programme) देण्याची बीएमसीची (BMC) तयारी असेल तर आम्ही परवानगी देऊ, असं मुंबई हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे.
कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणं प्रत्येकाला शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्ती यांना कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येऊ शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना घरी जाऊन कोरोना लस द्यावी, असं मुंबई उच्च न्यायलायने सांगितलं आहे. जर मुंबई महापालिकेची (BMC) यासाठी तयारी असेल तर मुंबई हायकोर्ट यासाठी परवानगी देईल, असंही कोर्टाने सांगितलं आहे.
हे वाचा - लशीच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी गडकरींकडे नवा प्लॅन, PM मोदींशी करणार चर्चा
हायकोर्टाने याआधी केंद्रालाही दारोदारी लसीकरण मोहीम राबवण्याबाबत विचारणा केली होती. पण केंद्र सरकार दारोदारी लसीकरण मोहीम राबवण्याच्या तयारीत नाही. जर बीएमसीला अशी लसीकरण मोहीम करायची असेल तर आम्ही परवानगी देऊन, केंद्र सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. असं कोर्टाने बुधवारी दिलेल्या निर्णयात म्हटलं आहे.
तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना मदत करायची आहे का? जरी केंद्र सरकार दारोदारी लसीकरणासाठी हिरवा कंदील देत नसेल, तरी आम्हाला तो देण्याची इच्छा आहे. जे लोक घराबाहेर पडू शकत नाही, त्यांच्या घरी जाऊन त्यांना कोरोना लस देण्याची बीएमसीची तयारी आहे का?, अशी विचारणा कोर्टाने बीएमसीला केली आहे.
हे वाचा - Corona Vaccination : कोरोना लसीकरणात मोठा बदल; मोदी सरकारने जारी केले नवे नियम
जर ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि अंथरूणाला खिळलेल्या, व्हिलचेअरवर असलेल्या व्यक्ती ज्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं शक्य नाही, त्यांना घरी जाऊन योग्य आरोग्य सुविधांसह कोरोना लस देणं शक्य असेल तर गुरुवारी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करावं, असे निर्देश कोर्टाने महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना दिले आहेत. गुरुवारी यावर पुढील सुनावणी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Mumbai high court