मुंबई, 26 एप्रिल : 1 मेपासून देशात कोरोना लसीकरणाचा (Corona vaccination) सर्वात मोठा टप्पा सुरू होणार आहे. 18 पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे. पण मुंबई मात्र नव्या टप्प्यातील लसीकरणासाठी (Corona vaccination in Mumbai) तयार नाही. 1 मेपासून 18+ मुंबईकरांना कोरोना लस नका देऊ नका, अशी मागणी मुंबई महापालिकेने केली आहे. याबाबत राज्य सरकारला विनंतीही केली जाणार आहे.
1 मेपासून 18 पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करायला मुंबई महापालिका तयार नाही. कारण इतक्या व्यापक प्रमाणात लसीकरण राबवण्याची तयारी झालेली नाही.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं, शहरात जवळपास 90 लाख लोकांना कोरोना लस दिली जाईल. शहरात आणखी जवळपास 270 कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याची गरज आहे. तसंच लशीचा पुरवठाही तसा व्हायला हवा. यासाठी आम्हाला पुरेशा अवधीची गरज आहे.
हे वाचा - कोरोना लस घेण्याआधी हा VIDEO जरूर पाहा; नाहीतर लसीकरणही पडेल महागात
मुंबई पालिका आयुक्त याबाबत राज्य सरकारला पत्रही लिहिणार आहेत. त्यानंतर राज्य सरकार नेमकं काय निर्णय घेईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या चार राज्यांतही 1 मेपासून 18+ नागरिकांचं कोरोना लसीकरण नाही
देशातील चार राज्यांनीही याआधी एक मेपासून लसीकरणाला सुरुवात करू शकणार नसल्याचं सांगितलं. राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. लशीच्या तुटवड्याचं कारण त्यांनी दिलं आहे. या चारही राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, आम्ही एक मेपासून लसीकरणासाठी संपूर्ण तयारी केली आहे. मात्र, लशीची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनीच पुरवठा करण्यास नकार दिला आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. तर, झारखंडमध्ये झामुमोसोबत काँग्रेस सत्तेत आहे.
हे वाचा - ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला
देशात 16 जानेवारी, 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानुसारच टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जातं आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. केंद्र सरकारने लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवला. त्यानंतर 1 मार्चपासून ज्येष्ठ आणि इतर आजार असलेल्या 45 पेक्षा जास्त वयांच्या नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. 1 एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्वच नागरिकांना कोरोना लस देणं सुरू झालं. आता 1 मेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Mumbai