अखेर जमणार ! 'युती'ची घोषणा सात दिवसांमध्ये होणार

अखेर जमणार ! 'युती'ची घोषणा सात दिवसांमध्ये होणार

'जागावाटप ही जरा किचकट प्रक्रिया असते. दोनही पक्षांमध्ये अनेक नवे लोक येत आहेत. आमची ताकद वाढत आहे. त्यामुळे काही जागांबाबतही फेरविचार करावा लागतो. त्यामुळे थोडा वेळ लागतोय.'

  • Share this:

उदय जाधव, मुंबई 11 सप्टेंबर : भाजप आणि शिवसेनेच जागावाटपावरून काही अडचणी असल्या तरी चर्चेच्या माध्यमातून त्या सोडवण्यात येतील. आठवडाभरात युतीची घोषणा होईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. जागावाटप ही जरा किचकट प्रक्रिया असते. दोनही पक्षांमध्ये अनेक नवे लोक येत आहेत. आमची ताकद वाढत आहे. त्यामुळे काही जागांबाबतही फेरविचार करावा लागतो. त्यामुळे थोडा वेळ लागतोय. युतीत अभेद्य असून आम्ही ऐतिहासिक विजय मिळवू अशी आशाही मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. मुनगंटीवार हे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला आले होते. त्यांनंतर त्यांनी 'न्यूज18 लोकमत'ला ही माहिती दिली. भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू असून भाजपला थोड्या जास्त जागा पाहिजे आहेत. तर शिवसेना 50 टक्के फॉर्म्युल्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

वाचा : राज ठाकरेंबद्दल अजित पवारांचं खळबळजनक विधान, म्हणाले ' ED चौकशी झाल्यापासून...'

शिवसेना 50 टक्के फॉर्म्युल्यावर ठाम

भाजप आणि शिवसेनेदरम्यान जागावाटपासाठी बोलणी सुरू आहे. ही बोलणी अंतिम टप्प्यात आली असं बोललं जात असतानाच शिवसेना समसमान जागावाटपावर ठाम असल्याची माहिती पुढे आलीय. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना पुन्हा एकदा 50:50 च्या जागा वाटपासाठी आग्रही आहे. दोन्ही पक्षांनी 288 पैकी 144-144 जागा वाटून घेण्याची शिवसेनेची भूमिका आहे. तर भाजपची जास्त जागांची मागणी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधल्या ज्येष्ठ लोकांना यावर तोडगा काढवा लागणार आहे. घटक पक्षांना देण्यात येणाऱ्या 18 जागांपैकी 9-9 जागा दोन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून द्याव्यात अशी शिवसेनेची मागणी आहे तर 174 भाजप आणि 114 शिवसेना = 288 जागा असा भाजपचा प्रस्ताव आणि या एकूण जागावाटप करुन प्रत्येकी ९ जागा घटक पक्षांना देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे त्यामुळे पुन्हा एकदा गुंता निर्माण झालाय.

वाचा : भाजपनंतर MIM कडून राष्ट्रवादीला शह, नेत्याला पक्षात घेत उमेदवारीही केली जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी  'युती'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अंतिम चर्चेला सुरुवात झालीय. या आधी प्राथमिक चर्चा झाली असली तरी ही चर्चा अंतिम फॉर्म्युला ठरविण्यासाठी असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालंय. चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या असून अजुन काही फेऱ्या होणार आहेत. झालेल्या चर्चेचा तपशील दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या ज्येष्ठ नेत्यांना देत आहेत. अंतिम तोडगा निघाल्यानंतरच भाजपचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गणेश विसर्जनापूर्वी हा तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 03:31 PM IST

ताज्या बातम्या