मराठा समाजातील 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करत आहे? आशिष शेलारांचा सवाल

मराठा समाजातील 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करत आहे? आशिष शेलारांचा सवाल

भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 जानेवारी : आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी मराठा (Maratha Reservation) समाजातील 739 तरुणांची (एसईबीसी) लोकसेवा आयोगाकडून निवड प्रक्रिया पूर्ण झाली असताना त्यांना शासन सेवेत का नियुक्ती दिली जात नाही? या तरुणांवर शासन अन्याय करत आहे, त्यांना तातडीने न्याय द्या,' असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

मराठा समाजातील तरुण आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात गेले 12 दिवस उपोषण करीत असून आज भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला पाठींबा दिला. या तरुणांचे म्हणणे ऐकल्यावर तसंच त्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आशिष शेलार यांनी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना दूरध्वनीवरून संपर्क करुन या तरुणांच्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या.

हेही वाचा - भाजपच्या कोअर कमिटीची उद्या बैठक, राज्यातील सद्यस्थितीवर होणार चर्चा

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी लोकसेवा आयोगाने परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या या 739 उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करुन प्रक्रिया पूर्ण केली होती तर मग त्यांना नियुक्ती का दिली जात नाही? याच काळात छाननी झालेल्या काही उमेदवारांना अन्य खात्यात नियुक्ती दिल्या गेल्याचे समजते, मग या 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करत आहे? अन्य समाजाला जसा शासनाने न्याय दिला तसाच न्याय मराठा समाजातील तरुणांना मिळावा. कुणावरही अन्याय होणार नाही अशी समान न्यायाची भूमिका शासनाने घ्यावी, अशी विनंती आशिष शेलार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केली.

दरम्यान, या तरुणांचे निवेदन स्वीकारुन त्याबद्दल शासनाकडे पाठपुरावा करु अशी ग्वाहीदेखील यावेळी आशिष शेलार यांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 31, 2021, 4:35 PM IST

ताज्या बातम्या