मुंबई, 31 डिसेंबर : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केलं होतं. यावर आता भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान आहे, अस्मिता आहे. अजित पवार म्हणतात की, ‘छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते’ विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे. हा अधिकार अजित पवार यांना दिला कुणी? तुषार भोसले? छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अजित पवार यांना नसल्याचे भोसले म्हणाले. छत्रपती संभाजी महाराजांविषयी असं बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना दिला कुणी? अजित पवार यांनी तातडीने माफी मागा किंवा राजीनामा द्या, अशी मागणी करत अजित पवार यांचे 14 मे 2019 चे ट्विट दाखवले आहे. अजित पवार 2019 पर्यंत संभाजी महाराज यांना धर्मवीर मानायला तयार होते. मात्र, आता 2022 मध्ये कशी त्यांना उपरती आली? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही प्रश्न विचारायचा आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपली भूमिका बदलणार का? की ते अजित पवार यांचा निषेध करणार? संजय राऊत यांची दातखीळ बसली आहे का? संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाला डाग लावलाय, असा घणाघाती आरोप भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी लावला आहे. वाचा - ‘छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, काही लोक जाणीवपूर्वक..’ अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं काय म्हणाले होते अजित पवार? महाराष्ट्रातील अधिवेशनात एखादं दुसरा चिमटा सोडला तर कधीही कोणत्याही राजकीय नेत्याने राजकीय भाषण केलं नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलेलं भाषण पूर्णपणे राजकीय होतं. तुम्ही सहा महिन्यांपूर्वी काय केलं? यातून आता बाहेर पडलं पाहिजे. महापुरुषांच्या अवमानाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकही शब्द काढला नाही. यावेळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन अजित पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही.
महापुरुषांच्या प्रश्नाला बगल दिली : अजित पवार सीमा प्रश्नावर एकमताने ठराव केला. बेळगाव, निपाणी गावांचा समावेश आम्ही करून घेतला. हरीश साळवे यांना यासाठी वकील म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली. चहा पानाचा विरोध करताना आम्ही जे पत्र दिले त्यात काही विषय दिले होते. अवकाळी पावसाने झालेले नुकसान, धानाला बोनस या मागणी होत्या. विदर्भ मराठवाड्यातील प्रश्न आम्ही मांडले त्यातील सगळ्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही. महापुरुषांचा अपमान होणार नाही यासाठी मंत्र्यांची हकालपट्टी करा, राज्यपाल हटवा या मुद्द्यांवर न बोलता दुसरे विषय आणून या प्रश्नाला बगल दिली. एकनाथ शिंदे शिवसेना फोडून बाहेर आले, याच्याबाहेर शिंदे अद्याप आले नाही. जे व्यक्ती सभागृहात नाही त्यावर ते सभागृहात आपल मत व्यक्त करतात. आमचं समाधान झालं नाही.

)







