महाराष्ट्रात भाजप पुन्हा डोकं वर काढणार? बिहारमधील निकालानंतर बदलली समीकरणं

महाराष्ट्रात भाजप पुन्हा डोकं वर काढणार? बिहारमधील निकालानंतर बदलली समीकरणं

भाजप-जेडीयू युतीने बहुमताचा आकडा पार केल्याने नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : एक्झिट पोलचे आकडे आणि राजकीय पंडितांचा अंदाज चुकवत बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. बिहारमध्ये सत्तापालट होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील, असं बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही. भाजप-जेडीयू युतीने बहुमताचा आकडा पार केल्याने नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवायच आता इतरही राज्यांची राजकीय समीकरणं बदलू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर अनपेक्षितपणे सत्तांतर झालं. शिवसेनेनं भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. या तीनही पक्षाच्या ऐतिहासिक आघाडीच्या बळावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच वारंवार भाजपकडून हे सरकार लवकरच कोसळणार, असा दावा केला जात आहे.

बिहार निवडणुकीनंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढणार?

महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारी होते. नंतरच्या टप्प्यात कोरोनाची लागण झाल्याने ते निवडणूक प्रक्रियेपासून दूर झाले. मात्र त्याआधी फडणवीस यांनी बिहारमध्ये चांगलंच लक्ष घातलं होतं. या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व म्हणता येईल असं नाही, मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत चांगलं यश मिळालं. राजदच्या खालोखाल भाजपला दुसऱ्या नंबरच्या जागा मिळवता आल्या. या यशामुळे देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतील वजन वाढण्यास मदत होईल, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत.

खरोखरंच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून बळ मिळालं तर राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

बिहार निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

'आम्ही राज्यातल्या सत्तांतराकडे लक्ष ठेवून काम करत नाही. राज्यातलं सरकार एके दिवशी स्वत:च्याच ओझ्यामुळे कोलमडून पडेल.कारण अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ज्या दिवशी हे सरकार कोसळेल, त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 11, 2020, 10:54 PM IST

ताज्या बातम्या