मुंबई, 17 ऑगस्ट : राज्यातील कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत असून अनेक राजकीय नेत्यांनाही या व्हायरसने लक्ष्य केलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'सिल्व्हर ओक'वर देखील कोरोनाचा (Coronavirus) शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. सिल्व्हर ओकवरील 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकूण सहा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. रॅपिड टेस्टमध्ये यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील कोणीही शरद पवारा यांच्या संपर्कात नव्हते, अशीही माहिती आहे.
दरम्यान, सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि पवारांच्या स्वीय सहाय्यकांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्याचे रिपोर्ट येणं बाकी
आहे.
शरद पवार भेट टाळणार?
थेट सिल्व्हर ओकवरील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विशेष खबरदारी घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याचं समजते.
पवारांचे राज्यव्यापी दौरे
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही काळ शरद पवार यांनी घरीच थांबणं पसंत केलं होतं. मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू होताच आणि राज्यातील कोरोनाचं संकट गडद होताच शरद पवार यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पवार यांनी राज्यभरातील विविध शहरांमध्ये जात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसंच स्थानिक नेते आणि प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या.
या संपूर्ण दौऱ्यात शरद पवार यांच्यासोबत अनेक लोकांचाही वावर होता. मात्र निवासस्थानावरीलच काही व्यक्त कोरोनाबाधित झाल्यामुळे शरद पवार हे पुढील काही दिवस बैठका टाळतील, अशी शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Sharad pawar