मुंबई, 26 मे : मुंबईत पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ (Coronavirus cases increasing in Mumbai) होताना दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या अशीच वाढत राहीली तर मुंबईत पुन्हा एकदा निर्बंध (restriction in Mumbai) लावण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh) यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत कोविड रुग्णसंख्या वाढते आहे याबाबत आढावा घेऊन चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, आज कॅबिनेटमध्ये जे मुद्दे होते त्या सर्वांवर चर्चा झाली. कोविडचे रुग्ण वाढले त्यावर चर्चा झाली. संख्या वाढली तर येत्या काळात निर्बध येण्याची शक्यता आहे. लोकांनी काळजी घेतली पाहिजे. अशीच रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंधांची वेळ येईल.
मुख्यमंत्र्यांनी केलं मास्क वापरण्याचं आवाहन
कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले आहे. राज्यातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली आहे. ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात 18.52 टक्के आणि 68.75 टक्के वाढ झाली आहे.
मुंबईत कोरोनाची स्थिती काय?
मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, काल (25 मे 2022) मुंबईत 295 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 194 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के इतका आहे. आतापर्यंत मुंबईतील 1042474 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्यस्थितीत मुंबईत एकूण 1531 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर 3973 दिवस इतका आहे. तर कोरोना बाधित रुग्णवाढीचा दर (18 मे - 24 मे) या कालावधीत - 0.017 टक्के इतका आहे.
वाचा : मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कर्मचाऱ्यांची तारांबळ
पुन्हा मास्क सक्ती होणार?
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात करताना राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले. मास्क मुक्ती झाल्याने नागरिकांनी सुद्धा मोकळा श्वास घेतला. पण आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा मास्क सक्ती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात केंद्राचं पाच राज्यांना पत्र
भारतातील काही भागांत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने गेल्या महिन्यात पाच राज्यांना पत्र लिहून अलर्ट दिला होता. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं होतं. या पाच राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजनेसाठी पावलं उचलण्याच्या सूचना केल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus, Coronavirus cases, Covid19, Mumbai