सुस्मिता भदाणे, मुंबई, 03 मार्च: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा प्रत्येक क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे. मुंबईतील प्रवाशांना परवडणारी सुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमावरही कोरोनाचा तीव्र परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. बेस्टची आर्थिक स्थिती कोलमडल्याने कर्मचाऱ्यांना सुट्ट्या नाण्यांमध्ये पगार द्यावा लागत आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्यातील पगारात तब्बल 15 हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाच ते दहा रुपयांच्या नाण्यांच्या आणि नोटांच्या (Best employees get salary in coin) स्वरूपात देण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे. खरंतर बेस्टला आपल्या परिवहन सेवेतून मोठ्या प्रमाणात नाणी, सुट्टे पैसे प्राप्त होत असतात. दरम्यान बेस्टचा बॅंकेसोबत असलेला करार जानेवारी 2021 मध्ये संपुष्टात आला आहे. त्यामुळे परिवहन सेवेतून मिळालेले सुट्टे पैसे कर्मचाऱ्यांना पगार स्वरूपात परत देण्यात आला आहे. बेस्ट प्रशासनाने त्वरित यावर तोडगा काढवा, अशी मागणी बेस्ट समितीतील भाजपचे सदस्य सुनिल गणाचार्य यांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीनं मासिक वेतन देण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. बेस्टच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही त्यावर चर्चा करण्यात आली आहे. जोपर्यंत बॅंकेच्या कंत्राटाबाबतीत ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीनं पगार देण्याचे संकेत देण्यात आले आहेत. यापूर्वी बेस्टने काही खाजगी बॅंकेसोबत करार केले होते. हा करार जानेवारी 2021 पर्यंत करण्यात आला होता. त्यानंतर आता मार्च महिना उलटला असतानाही, संबंधित कराराचं नुतनीकरण करण्यात आलं नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची वेळ बेस्टवर आली आहे. हे ही वाचा- मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचा इशारा, दोन दिवसांत घेणार निर्णय अशा पद्धतीनं दिली जाणारी रक्कम घेऊन जाणं, खर्च करणं आणि बॅंकेत हफ्ते म्हणून जमा करणं कर्मचाऱ्यांना कठिण जात आहे. यामुळे लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. केवळ नाण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी, हे सुट्टे पैसे कामगारांच्या माथी मारले जात आहेत, अशी टीकाही करण्यात येत आहे. येत्या आठवड्यात यावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासन बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.