मुंबई, 02 जून : ‘मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद (aurangabad) शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्यरीतीने पाणी कसे मिळेल हे पाहा’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackery) यांनी कडक निर्देश दिले आहे. तसंच, ‘पाणी योजनेच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. औरंगाबाद शहराच्या 1680 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करण्यासाठी या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला. ‘औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणे हे प्राधान्याचे काम असून शहर पाणीपुरवठा योजनेचे काम निधीअभावी रेंगाळणार नाही, याची दक्षता शासनाने घेतली आहे. शहराच्या पारोळ्यापर्यंत पाणी आणणे, ते साठविण्यासाठी टाक्या बांधणे ही कामे तातडीने करावी लागणार असून या योजनेचा काही भाग हा जायकवाडी प्रकल्पात असल्याने त्यासाठी केंद्रीय वन विभागाची परवानगी आवश्यक आहे, ही परवानगी मिळविण्यासाठी वन विभागाने तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. ‘शहरात पाणीपुरवठ्याची नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार असून कोणत्याही परिस्थितीत शहरात पाण्याअभावी परिस्थिती बिकट होणार नाही यासाठी गतीने कार्यवाही करून विभागीय आयुक्तांनी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले. ‘शहर पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम कंत्राटदार संथ गतीने करीत असल्याच्या तक्रारी आहेत ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. वेळेत काम पूर्ण करुन घेण्यासाठी संबंधित कंत्राटदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबरोबरच कालबद्धरित्या काम पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक तयार करा आणि मुख्यमंत्री संकल्प कक्षातून योजनेच्या कामाचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. विशेष म्हणजे, 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा आहे. या सभेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी पाणीप्रश्नाच्या मुद्यावर बैठक घेतली. काही दिवसांपासून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नावर जलआक्रोश मोर्चा काढला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







