मुंबई, 14 सप्टेंबर : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत चांगलाच 'सामना' रंगला. या प्रकरणात राष्ट्रवादीने शिवसेनेची बाजू घेत जास्त महत्त्व देऊ नये, असा सल्ला दिला होता. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी मराठा आरक्षण प्रकरणावर आपली भूमिका मांडली. यावेळी पत्रकारांनी कंगना आणि शिवसेनेच्या वादावर प्रश्न विचारला असता बाळासाहेब थोरातांनी सावध प्रतिक्रिया दिली. कंगना राणावत ही चंदीगडमध्ये पोहोचली आहे. 'आपण इथं मोकळेपणाने फिरत आहे. मुंबईत सोनिया सेना आहे त्यामुळे दहशतीचे वातावरण आहे', अशी टीका कंगनाने केली होती.
या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'हे जे काही प्रकरण आहे, त्यावर न बोललं बरं' असं म्हणून थोरातांनी या प्रकरणावर जास्त बोलण्याचे टाळले.
कंगना राणावत आणि शिवसेनेच्या वादावर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया pic.twitter.com/vCaL0ykwPN
— News18Lokmat (@News18lokmat) September 14, 2020
'मराठा आरक्षणाच्या संदर्भाचा सर्वोच्च न्यायालयात खटल्यात आपण शासन म्हणून पूर्ण काळजी घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती हा निर्णय अनाकलनीय आहे. स्थगितीचा विषयच नसताना न्यायालयाने हा निकाल दिला, यात पुढे कसे जायचे ते सरकार ठरवत आहे. सर्वांना एकत्र घेऊन याबाबत पुढे जायचं आहे. हा राजकारणाचा विषय नसून मराठा समाजाचा प्रश्न आहे', असं मत थोरात यांनी व्यक्त केलं.
तसंच, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत बोलले आहे. त्यांना सोबत घेऊन चर्चा करणार आहोत. न्यायालयात कशा प्रकारे जायचं आणि कशी भूमिका मांडायची यासाठी चर्चा करणार आहोत', अशी माहितीही थोरात यांनी दिली.
तर दुसरीकडे, 'ध्या अनेक प्रकरणावरून राज्य सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. राज्यातील वातावरण पाहता महाराष्ट्राला आणि सरकारला कसं बदनाम करता येईल हे पाहिलं जात आहे', अशी टीकाही थोरातांनी केली.
'महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे. निवडणुकीला ४ वर्ष आहेत. पण श्रीहरी अणेंना काय घाई झाली मला माहित नाही. राज्य सरकार सर्व पर्यायांवर विचार करत आहे', असा टोलाही थोरात यांनी अणेंना लगावला.
'विधान परिषदेच्या 12 जागांची नावं आम्ही लवकरच राज्यपालांकडे पाठवणार आहोत. पण राज्यपालांनीही ती नाव लगेच मंजूर करावी', असंही थोरात म्हणाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: काँग्रेस, बाळासाहेब थोरात