मुंबई, 3 मार्च : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शिवाजी पार्कमध्ये मॅार्निंग वॅाकला आले असता त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. अज्ञात लोकांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली. तर हा हल्ला परतवून लावण्याच्या प्रयत्नात संदीप देशपांडे यांच्या हाताला जबर मार लागल्याची माहिती आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संदीप देशपांडे यांच्यावर पाच अज्ञातांनी हल्ला केला. हल्लेखोर तोंडावर मास्क आणि रुमाल बांधून आले होते. तसेच त्यांच्याकडे हल्ला करण्यासाठी क्रिकेटचे स्टम्प होते. पाळत ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचे दिसून येते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी युवासेना पदाधिकारी वैभव थोरात यांचा महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढला होता. या प्रकरणात त्यांच्यावर प्रकरण दाबण्यासाठी वारंवार फोन केले जात होते, अशी माहिती मिळाली आहे. संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. राज ठाकरेंचे निकटवर्तीय - 1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.