मुंबई, 7 नोव्हेंबर : मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Cruise Drug Party Case) नवनवीन आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एक पत्रकार परिषद घेत नवा गौप्यस्फोट केले आहेत. आर्यन खान याचं किडनॅपिंग करुन खंडणी मागण्यात आली इतकेच नाही तर अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याला धमकावलं जात असल्याचाही गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
नवाब मलिकांनी म्हटलं, पहिल्या दिवसापासून शाहरुख खानला घाबरवलं जात आहे की, नवाब मलिकने जर बोलणं बदल केलं नाही तर तुझा मुलगा गेला.... (तुम्हाला लडका लंबा जायेगा). पूजा ददलानी यांना कदाचित घाबरवलं जात आहे की, 50 लाख तुम्ही दिले तर तुम्ही सुद्धा आरोपी बनणार. पण घाबरण्याचं कारण नाही. देशात जर कुणाच्या मुलाला किडनॅप करुन कुणी खंडणी मागत असेल आणि घाबरुन जर एखाद्याने पैसे दिले तर तो व्यक्ती गुन्हेगार नाही तर पीडित आहे. घाबरु नका. समोर या आणि सतक्य सर्वांना सांगा. या सर्वांचा पर्दाफाश करण्यासाठी मला मदत करा.
मला माहिती नाही कोण-कुणाला घाबरवत आहे. समीर वानखेडे हे कुणाला फोन करत आहेत हे मी सर्व काही आज बोलणार नाही. अनेक महिलांना घाबरवलं जात आहे. अनेक नागरिकांना घाबरवलं जात आहे. प्रायव्हेट आर्मी सक्रिय आहे. या प्रकरणातील व्हिलन जोपर्यंत जेलमध्ये जात नाही तोपर्यंत पिक्चर संपणार नाही असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.
'हा प्रकार किडनॅपिंग आणि वसुलीचा'
आर्यन खान हा स्वत: तिकीट काढून क्रूझवर पार्टीसाठी गेला नव्हता तर त्याला प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांनी क्रूझवर नेलं होतं. हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि खंडणी वसुलीचा आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा मोहित भारतीय आहे असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
मोहित कंबोज यांच्या मेव्हण्याच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला आणि आर्यन खानला क्रूझवर नेलं. त्यानंतर किडनॅप करुन 25 कोटींची मागणी करण्यात आली. डील 18 कोटींवर फायनल झाली. त्यापैकी 50 लाख रुपये घेण्यात आले. मात्र, एका सेल्फीने त्यांचा संपूर्ण खेळ बिघडवला. किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज आहे. वसुलीत मोहित कंबोज (भारतीय) हा वानखेडेंचा साथीदार आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं.
ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील मंत्र्याला अडकवण्याचा प्लॅन?
क्रूझ पार्टीवर राज्यातील कॅबिनेट मंत्र्याला सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. इतकेच नाही तर मंत्र्यांच्या मुलांनाही क्रूझवर पार्टीसाठी नेण्याचा प्लॅन होता. मंत्र्यांना क्रूझ पार्टीवर बोलावून अडकवण्याचा प्लॅन होता का? असा सवालही नवाब मलिकांनी उपस्थित केला आहे.
मुंबईतील तो मंत्री कोण?
नवाब मलिक यांनी म्हटलं, क्रूझवर जी केस बनवण्यात आली त्यात एका पेपर रोलला सीज करण्यात आलं आहे. त्याचं नाव आहे Namas Cray. या पेपर रोलमधून ड्रग्ज दिलं जात असल्याचं बोललं जात आहे. या पेपर रोलमध्ये ड्रग्ज होते म्हणून सीज केले गेले तर या प्रकरणात त्याच्या मालकाला का अटक जाली नाही? या मालकाच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
काशीफ खान हा समीर वानखेडेचा मित्र आहे. त्या दिवशी तो पार्टीत नाचत होता. त्याला अटक का करण्यात आली नाही?
हाच काशीफ आमच्या सरकारमधील मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही क्रूझ पार्टीवर येण्यासाठी फोर्स करत होता. मंत्रिमंडळातील नेत्यांच्या मुलांनाही हा व्यक्ती पार्टीला येण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याला का सोडून देण्यात आलं. एका षडयंत्राच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा प्लॅन होता का? अस्लम शेख यांना क्रूझवर पार्टीसाठी नेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती मात्र, ते गेले नाहीत असंही नवाब मलिकांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Drug case, Nawab malik, NCB, Shah Rukh Khan