Home /News /mumbai /

ईडीकडून सलग 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणते प्रश्न विचारले?

ईडीकडून सलग 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणते प्रश्न विचारले?

ईडीकडून सलग 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

    मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित सात मालमत्तांवर धाड टाकली. या धाडीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी अनिल परबांची अनेक तास चौकशी केली. ईडीकडून सलग 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या दापोली येथील साई रिसॉर्टवरुनच संबंधित कारवाई केली गेल्याची माहिती दिली. अनिल परब नेमकं काय म्हणाले? "ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज माझ्या शासकीय निवासस्थानावर, मी जिथे राहतो त्या घरावर, माझ्याशी संबंधित काही लोकांवर छापे घातलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बातम्या सतत येत होत्या. ईडीची कारवाई होणार अशाप्रकारच्या बातम्या सतत येत होत्या. या मागचा गुन्हा काय? हे तपासलं असता दापोली येथील साई रिसॉर्ट जे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, या रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत. त्यांनी त्यांचा मालकी हक्क सांगितला आहे. त्यांनी कोर्टातही तसा दावा केला आहे. त्यांनी त्यांच्या खर्चाचा सर्व हिशोब दिलेला आहे. आयकर विभागला हिशोब दिला आहे. त्यांच्यावर आयकर विभागाचीदेखील काही दिवसांपूर्वी धाड पडली होती. एवढं सगळं झालं असताना हे रिसॉर्ट अजूनही चालू झालेलं नाही. रिसॉर्टचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही", असं अनिल परब म्हणाले. (सकाळी ठाकरे, संध्याकाळी पवारांना मोठा दणका; अविनाश भोसले यांना CBI कडून अटक) "असं असताना पर्यावरणाची दोन कलमे लावून या रिसॉर्टमधून सांडणारी समुद्रात जातं अशाप्रकारचा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. जे रिसॉर्ट चालूच नाही, ज्याबद्दल प्रदुषण महामंडळाने निकाल दिलेला आहे, प्रांताने, पोलिसांनी रिसॉर्ट चालू नाही, असा निकाल दिला आहे. तरीसुद्धा साई रिसॉर्ट आणि माझ्या नावाने नोटीस काढली गेली. एक तक्रार काढली गेली. त्या तक्रारीवरुन ईडी अधिकाऱ्यांनी माझ्यावर ही छापेमारी केली. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे ज्या यंत्रणा मला प्रश्न विचारतील त्यांना उत्तर द्यायला मी बांधील आहे. त्यांना यापूर्वीदेखील मी उत्तर दिलेलं आहे", असं अनिल परब म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या