मुंबई, 26 जून : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेपुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी वारंवार बंडखोरांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले आहे. आताही राऊत यांनी ‘कब तक छिपोंगे गोहाती में..’ असं म्हणत शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे. काय ती झाडी…काय ते डोंगर…काय ती हाटील एकदम ओकेच..असं म्हणत शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी सोशल मीडियावर एकच धुरळा उडवून दिला आहे. शहाजी पाटील यांची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांच्याच वक्तव्याचा धागा पकडून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना टोला लगावला आहे.
कब तक छीपोगे गोहातीमे..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2022
आना हि पडेगा.. चौपाटीमे.. pic.twitter.com/tu4HcBySSO
‘कब तक छिपोंगे गोहाती में..आना ही पडेंगा.. चौपाटी में..’ असं म्हणत संजय राऊत यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा फोटो ट्वीट केला आहे. झिरवळ यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांना मान्यता दिली आहे. पण, एकनाथ शिंदे यांनीही भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य असल्याचा दावा केला आहे. पण, झिरवळ यांनी शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे शिंदेंची पिछेहाट झाली आहे. एवढंच नाहीतर महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकणार असा विश्वास व्यक्त करून शिंदेंच्या बंड गटाला मुंबई येण्याचे आव्हान केले आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात उपाध्यक्ष झिरवळ यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांवर सामनातून (Saamana Editorial) निशाणा साधला आहे. चार्टर्ड विमाने, गाडय़ा, हॉटेल्स यावर अमर्याद खर्च लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली सुरू आहे. इथे एक लक्षात घेतले पाहिजे, शिवसेना सोडून छगन भुजबळ व नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. एकनाथ शिंदे तरी होतील काय? शिवसेनेत राहूनच ते मुख्यमंत्री होण्याची खात्री जास्त होती. आज चाळीस आमदारांची फौज त्यांच्या बरोबर आहे. या आकडय़ांत पैशाला चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ‘ईडी’च्या भीतीने वर्षानुवर्षांच्या निष्ठा विकणारे उद्या श्री. शिंदे यांना सोडूनही पळ काढतील, असा टोला राऊत यांनी लगावला.

)







