मुंबई, 11 मार्च : MPSCची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर राज्यभरात मोठा गदारोळ झाला. विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर उतरत आक्रमक आंदोलन केलं. या आंदोलनाचा परिणाम झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या परीक्षेचा तारखा उद्याच जाहीर करण्यात येणार असून आठवड्याभरात MPSCची परीक्षा होईल, असं मी वचन देतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात MPSCच्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेबाबतही (MPSC Age Limit) मोठा दिलासा दिला आहे. 'परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरीही विद्यार्थ्यांना वयोमर्यादेबाबत कसलीही अडचण येणार नाही,' असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसंच कुणी राजकारणासाठी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवत असेल तर तसं होऊन देऊ नका, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
भाजपसह सरकारमधील नेत्यांनीच निर्णयाला केला होता विरोध
14 मार्च रोजी होणारी MPSCची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर भाजपसह सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनीच नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांचा समावेश होता.
'महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अवघ्या तीन दिवसांवर आली असताना अचानक ती पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा. कोविडचे संकट असले तरी कोविड संदर्भातील नियमांची अंमलबजावणी करत एमपीएससीच्या परीक्षा घ्याव्यात अशी मागणी करून आपण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिलं,' अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.