प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई, 11 मार्च : राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा बदल्यानंतर मनसे नव्या जोमाने कामाला लागली आहे. एकीकडे मनसेचा वर्धापन दिन सोहळा दणक्यात पार पडला. तर दुसरीकडे, नवी मुंबईमध्ये मनसेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. नवी मुंबईतील शहर अध्यक्ष गजानन काळे यांना कंटाळून उपशहर अध्यक्षासह अन्य पाच जणांन राजीनामे दिले आहे. राजीनामे देत असताना त्यांनी गजानन काळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे आता पक्षप्रमुख यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काय आहेत आरोप? नवी मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबई उप शहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांच्यासह अन्य पाच जणांनी शहर प्रमुख गजानन काळे यांच्या जाचाला कंटाळून आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनमे दिले आहेत. यात प्रवीण गाडेकर, उप विभाग अध्यक्ष, चंद्रकांत सकपाळ, उप विभाग अध्यक्ष, रोहन चव्हाण, सुशांत सैद, रोहित सैद सर्व शाखा अध्यक्ष यांचा समावेश आहे. या सर्वांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपण गजानन काळे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपल्या पदाचे राजीनामे देत असल्याचे सांगितले. त्या संदर्भात आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन गजानन काळे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोपही केले. वाचा - ‘तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्या आहात तर..’ धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडे यांना ओपन चॅलेंज, म्हणाले.. आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसाद घोरपडे यांनी गजानन काळे यांचे अनेक ठिकाणी आर्थिक हीत सबंध असल्याचा आरोप केला. ‘आम्हाला पक्षात काम करण्याचे स्वातंत्र्य नाही, काही बोलता येत नाही, काही करताही येत नाही. एखाद्या समाजोपयोगी कामा संदर्भात नवी मुंबई महानगर पालिकेसोबत पत्र व्यवहार केल्यावर,आम्हाला पालिकेचे अधिकारी कोणताही प्रतिसाद देत नाहीत,आम्ही विचारणा केल्यावर शहर प्रमुख यांच्यासोबत आर्थिक हीत सबंध असल्याचे सांगून आम्ही या संदर्भात काहीच करू शकत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आपण पदावर असल्याने जनेतेला न्याय देता येत नाही. त्यामुळे पदावर राहून काय उपयोग म्हणून मी पदाचा राजीनामा दिल्याचे घोरपडे यांनी सांगितले. गजानन काळे यांचे आर्थिक हितसंबंध? पुढे ते असं म्हणालं की, गजानन काळे यांचे इतरांशी आलेले आर्थिक हितसंबंध मी अनेक वेळा वरिष्ठ नेत्यांना सांगितले. मात्र, यावर त्यांनी त्यांचा नाइलाज म्हणून कदाचित मला काहीच प्रतिसाद दिला नाही. उलट यामुळे गजानन काळे यांनी मला माझ्या कार्यालयात येऊन धमकी देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यावेळी पक्षाचा पदाधिकारी असल्याने प्रकरण दाबले. मात्र, आता हे सर्व असह्य झाले असल्याने मी आणि माझे आणखी पाच जणांनी पदाचा राजीनामा दिला आहे की आम्हाला गजानन काळे यांच्या सोबत काम करण्यास असंख्य अडचणी होत आहेत.मात्र अजूनही आम्ही अन्य पक्षात जाण्याचा विचार केला नसून,पक्षाचे सदस्य म्हणून काम करत राहू,मात्र पुढे याबाबत निर्णय घेतला जाईल असे घोरपडे यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसापूर्वीच ठाणे येथील पक्षाच्या वर्धापन दिनी पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत आपण सत्तेत येणार अशी घोषणा केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होते आणि आज तेच नवी मुंबईतील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशाप्रकारचा निर्णय घेणे म्हणजे पक्षाला मोठा धक्का तर मानला जातोच मात्र अध्यक्षांच्या स्वप्नावर पाणी फिरण्याचा प्रकार म्हणावा लागेल.आता याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते,राजीनामा देलेल्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करणार की,गजानन काळे यांनाच पाठीशी घातले जाईल,हे पाहणे महत्त्वाचे असेल.