मुंबई, 27 एप्रिल : कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढण्यासाठी अनेक कोरोना कमांडो प्रयत्न करत आहे. डॉक्टर, पोलीस, नर्सेस, सफाई कर्मचारी सर्वजण कोरोनाला हरवण्यासाठी एकवटले आहेत. अगदी फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या पोलिसांचं विशेष कौतुक! मात्र या सर्वांना जर कोरोनाशी लढायचं असेल तर त्यांना मिळणाऱ्या सेवा देखील अद्ययावत असणं आवश्यक आहे. याकरता मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) धावून आला आहे. अभिनेता अक्षय कुमारने मुंबई पोलिस फाऊंडेशन (Mumbai Police Foundation) करता 2 कोटी दिले आहेत. (हे वाचा- कोरोनाला हरवण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार, 27 जिल्ह्यांसाठी सरकारची युद्धनीती) कमिशनर ऑफ मुंबई पोलीस यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अक्षय कुमारचे आभार मानणारे ट्वीट करण्यात आले आहे. या निधीचा वापर जे पोलीस कर्मचारी शहराचे संरक्षण करण्यासाठी बांधिल आहेत त्यांच्या संरक्षणासाठी करण्यात येईल, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
Mumbai Police thanks @akshaykumar for contributing Rs. 2 Crore to the Mumbai Police Foundation. Your contribution will go a long way in safeguarding the lives of those who are committed to safeguarding the city - the men and women of Mumbai Police!#MumbaiPoliceFoundation
— पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) April 27, 2020
दरम्यान याआधी अक्षय कुमारनं पंतप्रधान मदत निधीमध्ये 25 कोटी रुपये दान केले होते. तर मुंबई महापालिकेसाठी त्यांनी 3 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. आतापर्यत 28 कोटी दान केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा मुंबई पोलिसांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आतापर्यंत जेव्हाही देशावर काही ना काही संकट आलं आहे. प्रत्येक वेळी अक्षय लोकांची मदत केली आहे. ‘या काळात केवळ लोकांचं आयुष्य महत्त्वाचं आहे’, अशी पोस्ट यावेळी त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पोस्ट करून त्याने जनजागृती देखील केली आहे. कोरोनाबाबत लढा देणाऱ्या कोरोना कमांडोंसाठी त्याची ही मदत नक्कीच प्रेरणादायी आहे. संपादन - जान्हवी भाटकर