मुंबईत धोका वाढला, वरळीनंतर आता सायन कोळीवाड्यात सापडला कोरोनाचा रुग्ण
मुंबईत धोका वाढला, वरळीनंतर आता सायन कोळीवाड्यात सापडला कोरोनाचा रुग्ण
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली धारावी आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. त्यामुळे आता या भागात कोरोनाचं संक्रमण रोखणं मोठं आव्हान आहे.
मुंबईमध्ये अवघ्या 8 तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 63वर गेली आहे तर आज दिवसभरात महाराष्ट्रात 88 नवे रुग्ण सापडले आहे.
मुंबई 02 एप्रिल :मुंबईच्या वरळी कोळीवाडा, धारावीनंतर आता सायन कोळीवाड्यातील पंजाबी कॅम्प येथे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा रुग्ण राहत असलेली इमारत पालिका आणि पोलिसांनी सिल केली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत या इमारतीमधील रहिवाशांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात चाळी आणि झोपड्या आहेत. त्यात दाटीवाटीने लोक राहतात. अशा ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्या परिसरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच वरळी कोळीवाडा, घाटकोपर, धारावी सारख्या विभागातील दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांच्या वस्तीत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईच्या सायन कोळीवाडा विभागात पंजाबी कॅम्प आहे. हा विभाग भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाला त्यावेळी बॉर्डरवर असलेल्या लोकांचा म्हणून ओळखला जातो, या विभागात अनेक चाळी आहेत. या चाळीमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची माहिती मिळताच पालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलीस इमारत सिल केली आहे.
इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अन्न, धान्य तसेच लागणारे इतर साहित्य घरपोच दिले जाणार आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत आणि इतर रुग्णांच्या चाचण्यांचा रिपोर्ट येत नाही तो पर्यंत नागरिकांनी इमारतीबाहेर पडू नये असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
धारावीत दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण, सॅनिटाइझ करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण
कोरोना संदर्भात मुंबईकरांची चिंता वाढवणारे आकडे समोर आले आहेत. मुंबईमध्ये अवघ्या 8 तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 63वर गेली आहे तर आज दिवसभरात महाराष्ट्रात 81 नवे रुग्ण सापडले आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आता 416वर पोहोचली आहे. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या या वाढत्या आकड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून नियमांचं पालन करा आणि घरात सुरक्षित राहा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 6, पिंपरी चिंचवडमध्ये 3, मुंबईमध्ये 57, ठाण्यात 5, नगरमध्ये 9 आणि बुलढाण्यात 1 अशा 88 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या रुग्णांना कोरोनाची लागण कशी झाली याबद्दल अद्याप माहिती येणं बाकी आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज 5 नवे रुग्ण आढळून आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.