मुंबई, 25 एप्रिल : सध्या देशात सर्वत्र कोरोना विषाणूने (Corona Virus) हाहाकार माजवलेला असल्यामुळे भारताच्या आर्थिक स्थितीवरही विपरीत परिणाम होत आहे. त्याचा फटका शेअर बाजारवरही (Share Market) दिसत आहे. एकंदर परिस्थितीमुळे शेअर्स विक्रीचा दबाव वाढल्यामुळे निर्देशांक कोसळले. भारतातले शेअर बाजार आठवड्यात 1.9 टक्के घसरले असून, 28 फेब्रुवारी 2021 नंतरचं हे सर्वांत वाईट प्रमाण आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) यांच्यामध्ये एप्रिल महिन्यात आतापर्यंत सुमारे तीन टक्के घसरण झाली आहे. तसंच, मासिक घसरणीचा मे 2020 पासूनचा नीचांक या महिन्यात गाठण्याच्या दिशेने बाजारांची वाटचाल सुरू आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्स विकण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. 934.27 दशलक्ष डॉलर्सच्या शेअर्सची विक्री एप्रिलमध्ये आतापर्यंत झाली आहे.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 75च्या खाली आलं असून, जागतिक शेअर्समध्ये असलेल्या नकारात्मक कलामुळे परिस्थिती अधिक वाईट झाली आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 202.22 अंकांनी म्हणजे 0.42 टक्क्यांनी घसरून 47 हजार 878.45वर आला. निफ्टी 64.80 अंकांनी म्हणजेच 0.45 टक्क्यांनी घसरून 14 हजार 341.35वर बंद झाला.
सेन्सेक्सच्या घसरणीत सहभागी असलेल्या घटकांपैकी M&M चे शेअर्स सर्वांत जास्त गडगडले. त्यात 2.63 टक्क्यांनी घट झाली. त्याखालोखाल डॉ. रेड्डीज, टेक महिंद्रा, एचयूएल, भारती एअरटेल, आयसीआय बँक, टायटन, इन्फोसिस यांच्या शेअर्समध्येही घसरण झाली. तर पॉवर ग्रिड, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह यांच्या शेअरमध्ये 3.51 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
या आठवड्यात सेन्सेक्स 953.58 अंकांनी म्हणजेच 1.95 टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी 276.50 अंकांनी म्हणजेच 1.89 टक्क्यांनी घसरला.
सेक्टर्सचा विचार केला, तर बीएसई टेलिकॉम, रिअल्टी, टेक, एफएमसीजी, आयटी आदी क्षेत्रांत 1.33 टक्क्यांपर्यंत घट झाली. पॉवर, युटिलिटीज, फायनान्स या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली. व्यापक मार्केट्सचा विचार केला, तर बीएसई मिडकॅप (BSE Midcap) आणि स्मॉलकॅप (Small Cap) निर्देशांक 0.51 टक्क्यापर्यंत वाढले.
जागतिक बाजारांचा विचार केला, तर वॉल स्ट्रीट मार्केट घसरलं. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी श्रीमंत अमेरिकन नागरिकांवरचा कर वाढवण्याची योजना जाहीर केली, तसंच कॅपिटल गेन्स टॅक्स दुप्पट करण्याची घोषणा केली. त्यानंतर बाजार पडला. आशियात शांघाय, हाँगकाँग आणि सोल इथले बाजार सकारात्मक स्थितीत असून, टोकियोतला बाजार नकारात्मक स्थितीत आहे. युरोपातल्या बाजारातले व्यवहार तोट्यासह होत होते.
दरम्यान, ब्रेंट क्रूड (Brent Crude) अर्थात कच्च्या खनिजतेलाची किंमत 0.06 टक्क्यांनी कमी होऊन प्रति बॅरल 65.36 अमेरिकी डॉलर एवढी झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BSE, Coronavirus, Share market