न्यूयॉर्क, 9 जुलै : टेस्ला (Tesla) कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर कंपनी खरेदी करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून तीन महिने त्या विषयावर सर्वत्र चर्चा सुरू होती; मात्र ही डील कॅन्सल झाली असल्याचं त्यांनी आता जाहीर केलं आहे. त्यामागचं नेमकं कारण समोर आलं नसलं, तरी मस्क यांनी बनावट अकाउंट्सचं (Fake And Spam Accounts) कारण पुढे केलंय. हे डील नेमकं का कॅन्सल झालं असेल, याचं विश्लेषण काही तज्ज्ञांनी केलं आहे. त्यांच्या मते, नुकसान होऊ न देण्याच्या मस्क यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीमुळे हे डील रद्द झालं असू शकतं. नवभारत टाइम्सनं याबद्दल सविस्तर वृत्त दिलं आहे. जानेवारी महिन्यापासूनच मस्क यांनी ट्विटरची शेअर खरेदी सुरू केली होती. 14 मार्चला त्यांनी ट्विटरमध्ये 9.2 टक्के भागीदारी घेण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 5 एप्रिलला ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी मस्क हे ट्विटरच्या बोर्डमध्ये असतील, असं सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच, 10 एप्रिलला बोर्ड सदस्यांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय मस्क यांनी घेतल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं. 14 एप्रिलला मस्क यांनी संपूर्ण कंपनी प्रति शेअर 54.20 डॉलर्स दराने खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला. हे संपूर्ण डील 44 बिलियन डॉलर्सचं होतं; मात्र आता अचानक हे डील रद्द झालं (Twitter Deal Cancel) आहे. दरम्यानच्या काळात ट्विटर आणि टेस्ला या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले आहेत. एलॉन मस्क यांनी 21 एप्रिलला ट्विटर (Twitter) खरेदीसाठी योजना निश्चित केली होती. त्यासाठी स्वतःच्या निधीमधून 21 अब्ज डॉलर्स देणार असल्याचं मस्क यांनी सांगितलं होतं. ट्विटरच्या बोर्डनं 25 एप्रिलला हा प्रस्ताव मान्य केला होता. यानंतर ट्विटर खरेदीसाठी आपण जास्तच किंमत देऊ केल्याचं मस्क यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी काहीबाही कारणं द्यायला सुरुवात केली. आज ट्विटरच्या शेअरचा भाव 36.81 डॉलर्स आहे. म्हणजेच मस्क यांनी जो दर लावला होता, त्याच्या तुलनेत ही रक्कम एक तृतीयांश कमी झाली आहे. म्हणूनच डीलमध्ये चांगला भाव मिळण्यासाठी मस्क कारणं देऊ लागले. खरंच! 25 वर्षे एक रुपयाही वीज बिल येणार नाही, ‘ही’ सरकारी योजना आहे सुपरहिट ट्विटरवरची 20 टक्के अकाउंट्स बनावट (Fake Accounts) असल्याचं मस्क यांनी 17 मे रोजी सांगितलं. आपण ट्विटर खरेदीसाठी जी रक्कम देणार होतो, ती ट्विटरच्या खऱ्या ग्राहकसंख्येवर आधारित होती, असं ते म्हणाले. त्यामुळे जोपर्यंत बनावट अकाउंट्स 5 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत हे डील पुढे नेणार नसल्याचं मस्क यांनी म्हटलं होतं. तज्ज्ञांच्या मते, मस्क यांच्या या धमकीला काही अर्थ नव्हता. कारण हे डील ग्राहकसंख्येसारख्या गोष्टीवर अवलंबून नव्हतं. ट्विटरचा महसूल, कॅश फ्लो किंवा नफा या बाबींवर 44 अब्ज डॉलर्सचं मूल्यांकन अवलंबून नव्हतं. तज्ज्ञांच्या मते हे डील रद्द होण्यामागे दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे सध्या टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या शेअर्सच्या दरांत घसरण झाली आहे. यात ट्विटर तर आहेच, शिवाय टेस्लाचे शेअर्सही निम्म्यावर घसरले आहेत. शुक्रवारी (8 जुलै) टेस्लाचे शेअर्स 752.29 डॉलर्सवर बंद झाले. 4 एप्रिलला त्याची किंमत 1149.91 डॉलर होती. कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे मस्क यांचं खूप नुकसान झालं आहे. मस्क यांचे टेस्लामध्ये जवळपास 17 कोटी 50 लाख शेअर्स आहेत. या नुकसानामुळे ट्विटर खरेदीच्या डीलमध्ये अडचण निर्माण झाली. ट्विटरच्या खरेदीनं फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल, असं मस्क यांना वाटल्यानं त्यांनी हे डील रद्द केलं आहे. त्यासाठी त्यांनी कारण मात्र बनावट अकाउंट्सचं दिलं आहे. हे डील रद्द झाल्याचं मस्क यांनी जाहीर केल्यावर ट्विटरने मस्क यांच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे हे नाट्य अजून काही दिवस रंगणार असल्याचं दिसतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.