मुंबई, 13 ऑक्टोबर: तुमच्या हातात 2000 रुपयांची गुलाबी नोट (2000 Rupee Notes) शेवटच्या वेळी कधी आली होती? डोक्याला थोडा जोर लावल्यावर तुम्हाला नक्की आठवेल की एटीएममधून दोन हजार रुपयांची नोट आल्यावर तुम्हाला सुट्टे पैसे घेण्यासाठी तुम्हाला कसं इकडे तिकडे फिरावं लागलं होतं. परंतु अलीकडच्या काळात आपल्या चलनातील या सर्वात मोठ्या नोटांचे चलन कमी झालं आहे. रिझर्व्ह बँकेनं आपल्या वार्षिक अहवालात याबाबत मोठी माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात 2000 रुपयांच्या नोटांच्या तुटवड्याचं मोठं कारण समोर आलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार आर्थिक वर्ष 2019-20, आर्थिक वर्ष 2020-21 आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. त्यामुळे बाजारात 2000 रुपयांच्या नोटांचे चलन कमी झालं आहे. 2000 च्या नोटा कधी जारी झाल्या? नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट जारी केली. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर सर्व 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. या चलनांऐवजी रिझर्व्ह बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. चलनातून बाहेर काढलेल्या नोटांचे मूल्य 2000 रुपयांची नोट सहज भरून काढेल असा रिझर्व्ह बँकेचा विश्वास होता. अहवालानुसार, 2000 रुपयांच्या नोटेमुळे उर्वरित नोटांची गरज कमी झाली आहे. हेही वाचा: डबल धमाल! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुमचे पैसे करेल दुप्पट, वाचा डिटेल्स नोटा बंद झाल्या आहेत का? 31 मार्च 2017 पर्यंत, चलनात असलेल्या नोटांच्या एकूण मूल्यामध्ये 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 50.2 टक्के होता. त्याच वेळी, 31 मार्च 2022 रोजी चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मूल्यात 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 13.8 टक्के होता. रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट बंद केली नसली तरी ती छापली जात नाही. 2000 च्या नोटा कधीपासून छापल्या गेल्या नाहीत? 2000 च्या नोटा 2017-18 मध्ये देशात सर्वाधिक चलनात होत्या. यादरम्यान बाजारात 2000 च्या 33,630 लाख नोटा चलनात होत्या. त्यांची एकूण किंमत 6.72 लाख कोटी रुपये होती. 2021 मध्ये मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत माहिती दिली होती की, गेल्या दोन वर्षांपासून 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. वास्तविक, आरबीआयशी बोलल्यानंतर सरकार नोटांच्या छपाईबाबत निर्णय घेते. एप्रिल 2019 पासून रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही.
2000 रुपयांच्या नोटांची छपाई न झाल्यामुळे त्या आता लोकांच्या हातात कमी दिसत आहेत. त्यामुळेच एटीएममधून या नोटा फार कमी वेळा बाहेर पडत आहेत. येत्या काळात रिझव्र्ह बँक त्याची छपाई सुरू करणार की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.